धुळे : शहरातील मोतीनाला परिसरातील मोतीनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एका मजुराच्या घराला आग लागली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरातील नागरिकांना वेळीच अग्निशमन दलाला माहिती दिली. परंतु चिंचोळ्या गल्लीमुळे बंबाला प्रवेश करता येत नसल्यामुळे याच भागात असलेल्या एका बोरिंगचा आधार घेऊन आग विझवावी लागली. यात संसारोपयोगी साहित्य जळून गेल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले.
प्रकाश पोपट लोहार हे मोलमजुरी करून आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवितात. ते शुक्रवारी रात्री घराला कुलूप लावून आपल्या नातेवाइकांकडे गेले होते. त्यांच्या घरात रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घराला लावलेले कुलूप तोडले आणि सुरुवातीला गॅस सिलिंडर सुरक्षित स्थळी हलविले. त्वरित वीज मंडळाला कळविल्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आली. काही क्षणात अग्निशमन बंबदेखील घटनास्थळी दाखल झाला. पण, चिंचोळ्या गल्लीत बंबाला जाता येत नव्हते. परिणामी लवकर आग विझविणे शक्य झाले नाही. आगीच्या या दुर्घटनेत लोहार यांच्या मुलाची दहावीची पुस्तके, मुलीच्या लग्नासाठी जमविलेले एक लाखांची रोकड यासह कपडे, प्लॅस्टिकची भांडी आदी सर्वसामान्य वस्तू जळून खाक झाले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रवची नोंद करण्यात आली.