रियालिटी चेक
सुनील बैसाणे
अग्निशमन विभाग कार्यालय @ 1:am
धुळे : रात्री अपरात्री जरी आग लागली तरी महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग अलर्ट आहे. धुळेकरांच्या सेवेसाठी चोवीस तास सेवा उपलब्ध असून, आग आटोक्यात आणण्यासाठी ३३ कर्मचाऱ्यांचा ताफा आहे.
अग्निशमन विभाग प्रमुखांसह एकूण ३३ कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. या विभागाचे काम तीन शिफ्टमध्ये चालते. सकाळी ८ ते दुपारी ४, ४ ते रात्री १०.३० आणि रात्री १०.३० सकाळी ८ अशा शिफ्ट आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये अग्निशमन अधिकाऱ्यांसह ११ कर्मचारी असतात.
अग्निउपद्रवाची घटना घडली तर सुरुवातीला एका गाडीवर चालक, फायरमन जातात. तत्पूर्वी ते इतर सहकाऱ्यांना अलर्ट करतात. परिस्थिती पाहून इतरांनाही बोलावले जाते.
सैन्य दलाप्रमाणे संत्री ड्युटी...
अग्निशमन विभागात देखील सैन्य दलाप्रमाणे संत्री ड्युटीची पध्दत आहे. त्यानुसार चालक आणि फायरमनची एक जोडी रात्री ११ ते १, दुसरी जोडी १ ते ३ आणि तिसरी जोडी ३ ते सकाळी ८ वाजेपर्यंत जागी असते. त्यामुळे हा विभाग चोवीस तास सजग असतो.
तयार स्थितीत बंब तीन
शहराच्या अग्निशमन विभागाकडे चार बंब आणि एक जीप आहे. त्यापैकी तीन बंब आणि जीप पाणी भरुन चोवीस तास सज्ज असतात.
एक वाहन पाणीपुरवठ्यासाठी राखीव ठेवले आहे. ऐनवेळी ताजे पाणी भरता यावे म्हणून ते राखीव असते. प्रसंगी त्याचीही मदत होते.
दोन कर्मचारी जागे
रात्रीच्या शिफ्टमध्ये चालक आणि फायरमन असे दोन कर्मचारी जागे असतात. इतर झोपू शकतात.
काॅल आल्यावर सुरुवातीला एक बंब रवाना होतो. घटनास्थळाची परिस्थिती पाहून इतर बंबांना पाचारण केले जाते. पहिला बंब रवाना होताना इतर तयार होतात.
नियम काय सांगतो
शासनाव्या नियमाप्रमाणे अग्निशमन विभाग चोवीस तास सजग असला पाहिजे. पुरेसा कर्मचारी वर्ग आणि सुरक्षा साधने आवश्यक आहेत.
तसेच अग्निशमन विभागाचा फोन चोवीस तास सुरूच हवा. त्वरित प्रतिसाद देणे बंधनकारक आहे.
अग्निशमन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी चोवीस तास अलर्ट आहे. पोलीस नियंत्रण कक्षात देखील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक देखील दिले आहेत. पोलीस निंयत्रण कक्षात तक्रार गेली तरी आम्हाला त्वरित कळते आणि मदतकार्यासाठी आम्ही रवाना होतो. नागरिकांनी सहकार्य करावे. - तुषार ढाके, अग्निशमन विभाग प्रमुख