धुळे : शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक शिवभोजन केंद्रांवरुन दररोज किमान १५ ते २० जणांना उपाशीपोटी परत जावे लागते. त्यामुळे शिवभोजन केंद्रांची संख्या वाढवावी तसेच थाळ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
जिल्ह्यात एकूण २१ शिवभोजन केंद्र आहेत. धुळे शहरात
१२ तर ग्रामीण भागात ९ केंद्र सुरु आहेत. सध्या मोफत भोजन दिले जात आहे. शिवाय थाळ्यांची संख्या दीडपटीने वाढवलेली आहे. दररोज सुमारे ३ हजार थाळ्यांचे वाटप होत आहे. त्यामुळे काेरोना संसर्ग व कठोर निर्बंधांच्या काळात गरिब, गरजू नागरिकांचे, कुटूंबांचे पोट भरत असले तरी थाळ्या संपल्यावर अनेकांना उपाशीपोटी परत जावे लागते.
उपशीपोटी परतले
बस स्थानक केंद्र : शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर थाळ्यांची संख्या सर्वाधिक आहे. बाहेरील केंद्रावर सध्या ३०० थाळ्या तर आतील केंद्रावर १८८ थाळ्या वाटप होतात. बस स्थानक परिसर असल्याने तसेच शेजारी गरिबांची मोठी बस्ती असल्याने थाळ्या अपूर्ण पडतात.
मार्केट कमिटी केंद्र : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील केंद्रावर चांगली गर्दी असते. कधी थाळ्या पुरेशा ठरतात तर कधी कमी पडतात. बाजाराच्या दिवशी अनेकांना उपाशीपोटी परतावे लागते.
हिरे रुग्णालय : रुग्णालयात रुग्ण तसेच नातेवाईकांची संख्या मोठी असते. त्यामुळे या शिवभोजन केंद्रावर अनेकांना उपाशीपोटी परतावे लागते.
रोज तीन हजार जणांचे पोट भरते; बाकीच्यांचे काय?
शहरासह जिल्ह्यातील २१ शिवभोजन केंद्रांवर सुमारे ३ हजार जणांचे पोट भरते.
परंतु, जिल्ह्यात गरिब गरजूंची संख्या खुपच जास्त आहे. त्यांचे काय असा प्रश्न पडतो.