लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : धुळे जिल्ह्यात पेसाच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ ऑगस्ट रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
संघटनेच्या वतीने, धुळे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन नोकरभरती करण्यात यावी. धुळे जिल्हा हा अंशत: ५व्या अनुसूचित असून, पेसा कायद्याच्या कक्षेत आहे. त्यामुळे राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार पेसा क्षेत्रातील १७ संवर्गांची सरकारी पदे ही स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून भरणे भाग आहे. मात्र असे असताना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतील सर्व खाती, जिल्ह्यातील सर्व प्रकारची सरकारी व निमसरकारी कार्यालये, आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, संस्थांची अनुदानित विद्यालये आदी ठिकाणी पेसा कायद्यांतर्गत अनुसूचित जमातीचा पदभरतीचा अनुशेष हजारोंच्या संख्येने रिक्त आहे.
तो अनुशेष पूर्ण क्षमतेने स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आले. यावेळी बिरसा फायटर्सचे नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, सचिव साहेबराव पावरा, शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे यांनी १५ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे उपोषण केले. तद्नंतर शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनाही निवेदन देऊन पेसा नोकरभरती लवकर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
फोटो- मेलवर
पेसा भरतीसाठी बिरसा फायटर्सचे उपोषण.