नेर येथून सुरत-नागपूर महामार्ग जात आहे. परंतु महामार्ग तयार करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट केल्याने नेर येथील महाल रायवट आणि महालकाळी या शिवारात महामार्गालगतचा भराव खचला आहे. याबाबत ‘लोकमत’ने गुरुवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी याची दखल घेऊन जेसीबी यंत्र पाठवून महामार्गाच्या भरावाच्या डागडुजीला सकाळीच सुरुवात केली. शेतकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी जाऊन या कामास तीव्र विरोध केला. तसेच संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जोपर्यंत या ठिकाणी येत नाहीत, आणि शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत अंमलबजावणी करीत नाही, तोपर्यंत या डागडुजीचे कामही होऊन न देण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे या ठिकाणी आलेले जेसीबी मशीन आणि कामगारांना अखेर शेतकऱ्यांचा विरोध पाहून माघारी फिरावे लागले.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान....
या महामार्गामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर तो शेतकऱ्यांच्या जिवावरही उठला आहे. महामार्गाच्या बाजूला सर्व्हिस रोड न केल्याने मातीचा भराव केला आहे. त्यामुळे हा भरावही पावसाच्या पाण्यात वाहून जात आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी थेट शेतात उभ्या पिकात जात आहे. त्यामुळे पिके सडून नुकसान होत आहे. तर महामार्ग दुरुस्तीसाठी जेसेबी मशीनमुळे शेताचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे हे काम शेतकरी योगेश गवळे, शंकरराव खलाणे, सतीश बोढरे, नामदेव बोरसे, सुभाष वाघ, सुरेश सोनवणे, पंडित जगदाळे, नीलेश माळी, राकेश माळी,पोलीस पाटील विजय देशमुख यांनी बंद पाडले आहे.
कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.....
महामार्गालगत शेती व रहिवास आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी महामार्गाच्या भरावामुळे शेतात व घरात शिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. -शंकरराव खलाणे, माजी सरपंच, नेर