शिरपूर : राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये स्मार्ट कॉटन योजना राबविली जात असून, त्यात धुळे जिल्ह्याचादेखील समावेश असणार आहे. स्मार्ट कॉटनच्या माध्यमातून भविष्यात चांगल्या प्रकारच्या कापसाच्या गाठी तयार करू शकतो. स्वच्छ कापूस निर्मिती करू शकतो. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारमेंट सुरू आहे. एकत्र येऊन कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह कंपनीचा फायदा होऊ शकतो. तपनभाई पटेल किसान समृद्धी योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. तसेच शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून ब्रँडिंग करावे, असे प्रतिपादन आत्मा योजनेचे प्रकल्प उपसंचालक डॉ. शांताराम मालपुरे यांनी केले.
१३ रोजी येथील पटेल ऑडिटोरियम हॉलमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, कृषी विभागाचे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर डॉ. दिनेश नांद्रे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रोहित कडू, मार्केट कमिटी सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, पं. स. सभापती सत्तारसिंग पावरा, शिसाका अध्यक्ष माधव पाटील, जि. प. चे माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील, वसंत पावरा, तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुंवर, नारायणसिंग चौधरी, प्रकाश भोमा पाटील, योगेश बादल, काशीनाथ राऊळ, संचालक अविनाश पाटील, विजय बागुल व शेतकरी उपस्थित होते.
आत्मा योजनेचे प्रकल्प उपसंचालक डॉ. शांताराम मालपुरे म्हणाले, आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे भविष्यात महिला शेतकऱ्यांच्या उत्पादन कंपन्या स्थापन करू शकतात. महिला शेतकरी कंपन्या या राज्यात मोजक्याच आहे, जिल्ह्यात एकही नाही. त्यासाठी महिलांनी पुढे आल्यास निश्चितच त्याचा लाभ होऊ शकतो. स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून गट व कंपनी मिळून आतापावेतो या तालुक्यातील नऊ लोकांनी अर्ज सादर केले आहेत.
कृषी विभागाचे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर डॉ. दिनेश नांद्रे म्हणाले, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करावयाचे असेल तर त्यांनी रासायनिक खते न वापरता सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांमुळे शेतीचा ऱ्हास होत आहे. त्याकरिता कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. शेतकरी जोपर्यंत त्याच्या शेतमालाला किंमत लावत नाही तोपर्यंत त्या मालाची किंमत वाढणार नाही. एकेकाळी धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेती केली जात होती, मात्र सद्य:स्थितीत सेंद्रिय शेती फारशी दिसत नाही.
पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय कुंवर म्हणाले, सुरुवातीच्या काळात श्रीमंती ओळखावयाची असेल तर पशुधन मोठ्या प्रमाणावर असत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावयाचे असेल तर ती क्वॉलिटीयुक्त असावी, शेतीपूरक व्यवसाय हवेत. रासायनिक शेती करायला लागल्यामुळे सेंद्रिय शेती दिसेनाशी होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केमिकल्स शेतीकडे न वळता सेंद्रीय शेतीसोबत पूरक व्यवसाय करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार काशीराम पावरा म्हणाले, शासनाच्या चांगल्या योजना आहेत, मात्र त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, हे दुर्दैव आहे. त्याकरिता प्रत्येक विभागाने सहकार्य केले तर निश्चितच शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचू शकतात. पेरणीच्या वेळी वेळेवर बियाणे मिळत नाही, खत मिळत नाही, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी केले, तर प्रास्तविक के. डी. पाटील यांनी केले.
इन्फो
तालुक्यातील शेतकरी सुजलाम-सुफलाम होण्यासाठी उद्योगपती तपनभाई पटेल यांच्या स्मरणार्थ किसान समृद्धी योजना राबविली जात असल्याचे भूपेशभाई पटेल यांनी सांगितले. तसेच मेहा शर्वीलभाई पटेल यांच्या सीएसआर फंडच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांचा विकास साधला जाईल. मेहा यांचे पती दरवर्षी सव्वादोन कोटी रुपयांची देणगी देत असतात. यापुढे २५ कोटी रुपये या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दिले जाणार असल्याचे मेहा पटेल यांनी सूचित केले आहे.
तालुक्यात ७० शेतकरी गट असून शासकीय फंड, सेस फंडबरोबर आता सीएसआर फंडच्या माध्यमातून तपनभाई किसान समृद्ध योजना राबविली जाणार आहे. नाशिक, सुरत, मुंबई, इंदौर येथील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून येथील शेतकऱ्यांना उद्योजक केले जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकाधिक गट तयार करण्याचे आवाहन भूपेशभाई पटेल यांनी केले.