तऱ्हाडी, वरूळ, जवखेडा, विखरण परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र गेल्या दोन दिवसात जेमतेम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पिकांना जाड युरिया व इतर खत देणे गरजेचे आहे. परिसरात युरिया घेण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. याचाच फायदा घेत काही दुकानदार युरिया घ्यायचा असेल तर इतर खते घ्या. नंतरच तर एक गोणी युरिया मिळेल अशी अट घालत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकऱ्यांनी युरियासोबत इतर खते घेतली पाहिजे असा नियम नाही. ज्या दुकानाबाबत तक्रार असेल त्यांनी कृषी विभागाला तक्रार करून संपर्क करावा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पंचायत समितीचे कृषी अधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.