कापडणे येथे सुनील सुरेश मोरे यांनी धामणे रस्ता लगतच्या शेतात पाच बिघे शेतीत ज्वारी पेरणी केली होती. पीक ऐन बहारात येत असताना, विद्युत क्रमांक ५३७ या रोहित्रात बिगाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, ज्वारीचे पीक जळू लागले. मोरे यांनी वीज वितरण कंपनीला विद्युत रोहित्र सुरू करण्याची वारंवार विनंती केली. मात्र, संबंधित वीज कंपनीने सुनील मोरे यांच्या सह सर्व शेतकऱ्याना सत्तर ते ऐंशी हजार रुपये थकीत वीज बिल भरण्याचे सांगितले. सुनील मोरे यांनी माझे वीज बिल मी भरण्यास तयार आहे, तरीही वीज वितरण कंपनीने विद्युत रोहित्र सुरू करण्यास नकार दिल्याचे सांगितले.
गेल्या दीड महिन्यापासून विद्युत रोहित्र बंद असल्याने, मोरे यांची पीक वाचविण्याची धडपड सुरू होती. रोहित्र सुरू करण्याकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत होते. अखेर १३ रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आमच्या शेतातील विद्युत रोहित्र का सुरू करण्यात येत नाही, असा जाब वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता अंजली हिंगमीरे यांना मोरे यांनी विचारले असता, त्यांनी सर्वांनी वीजबिल भरा, तरच विद्युत रोहित्र सुरू होईल, असे सांगितले. यावेळी सुनील मोरे यांनी आपल्या खिशातून कीटक नाशक औषधाची बाटली काढत विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून बाटली हिसकावल्याने अनर्थ टळला. यावेळी शेतकरी भय्या मोरे, दादा माळी, सुरेश मोरे, आबा मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य शरद माळी आदी उपस्थित होते.