धुळे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण समितीची आढावा बैठक झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, स्वच्छता सर्वेक्षण हे देशव्यापी आहे. १ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण होईल. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षणात उत्कृष्ट ठरणाऱ्या जिल्ह्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाणार आहे. यामध्ये हगणदारीमुक्त गावांची पडताळणी, शौचालयांच्या नवीन बांधकामांची पाहणी केली जाणार आहे.
प्रत्यक्ष पाहणीअंतर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडा बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष, तसेच ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविली जाणार आहे. स्वच्छाग्रही खुली बैठक, व्यक्तिगत मुलाखती, सामूहिक चर्चा करून गावांची प्रतिक्रिया घेण्यात येणार आहे. प्रत्येक तीन ते चार गावांचे सरपंच, स्वच्छाग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. गावाच्या पाहणीदरम्यान गावाची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन स्थिती व कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी केली जाईल, असे सांगून सर्वेक्षणात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
१ सप्टेंबर २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त राबविण्यात येणारे विविध उपक्रम, घोषवाक्य लेखन स्पर्धा, सार्वजनिक ठिकाणच्या भिंती रंगविणे, १०० दिवसांचे शौषखड्डे स्थायित्व व सुजलाम अभियानात केलेल्या कामाचा तालुकास्तरीय यंत्रणेकडून आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा कक्षातील तज्ज्ञ, सल्लागार उपस्थित होते.