शहरात ४ वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश असले तरी दारू दुकाने मात्र उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे मद्यपी पार्सल घेऊन बेकायदेशीरपणे मोकळ्या जागांवर दारू पिताना दिसतात, तसेच गांदूर रोडसह शहरालगतच्या इतरही रस्त्यांवर खास हाॅटेल्स सुरू झाली आहेत. दारू दुकानावरून पार्सल आणल्यावर या हाॅटेल्समध्ये बसण्याची व्यवस्था केली जाते. शिवाय दारूदेखील उपलब्ध करून दिली जाते. यामुळे सामाजिक वातावरण दूषित होत आहे. या प्रकारांना आळा घालण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
धुळे शहरात पांझरा नदीच्या किनारी असलेल्या दोन्ही रस्त्यांवर रात्रीच्या वेळी तळीरामांची मैफील जमते. वाॅईन शाॅपवरून पार्सल घेऊन नदीकाठी अनेकजण मद्य पिण्यासाठी जमतात. त्यामुळे नदीपात्रात प्लास्टिक प्रदूषण वाढत आहे. या रस्त्यांवर वेळोवेळी पोलिसांची गस्त असते. तरी देखील या गैरप्रकाराला आळा बसला नाही.
धुळे शहरातील देवपुरात वाॅइन शाॅप सायंकाळी चार वाजेनंतर सर्रासपणे सुरू असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दुकानांची वेळी ४ वाजेची असली तरी या आदेशाला दारू दुकानदारांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. दारू दुकानावर नेहमीच गर्दी असते. रहिवासी वस्ती असल्याने शेजारींना त्रास सहन करावा लागतो.
धुळे शहरात बियरबार देखील सायंकाळी ४ वाजेनंतर सर्रासपणे सुरू असतात. देवपुरातील गोंदूर रोडवर बियरबार रात्रीपर्यंत सुरू होते. सुरुवातीला शटरडाऊन करून सुरू असलेले हे बार आता शटर उघडे करून सुरू असतात. बारच्या पाठीमागे रहिवासी वस्ती आहे. रहिवाशांच्या तक्रारी नसल्या तरी मद्यपींच्या आवाजाचा त्यांना त्रास आहे.
शेजाऱ्यांना त्रास, तक्रार करूनही फायदा नाही
पांझरा नदीकिनारी रस्त्यांवर सायंकाळनंतर मद्यपींची बैठक जमते. त्यामुळे शतपावली करण्यासाठी येणाऱ्या बाया-माणसांची गैरसोय होते. या प्रकाराला चाप बसला पाहिजे. - एक नागरिक
घरांना लागूनच बार, वाईनशाॅप असल्याने गर्दी, गोंगाट असतो. वाहनांची वर्दळ असते. फार त्रास नसला तरी बरेवाईट कानावर पडते. मुलांवरही चुकीचे संस्कार घडतात.
- एक नागरिक
तक्रार आली तर कारवाई करू
मद्यपींच्या बाबतीत तक्रारी आल्यावर कारवाई केली जाते. पोलिसांची गस्त नियमित असते. दिसल्यावर कारवाई होतेच; परंतु नागरिकांनी तक्रारी केल्यास त्वरित बंदोबस्त केला जाईल. - चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक.