साक्री येथील सि.गो. पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोनवणे बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे,तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, पर्यवेक्षक प्रा.डी.पी.पाटील आदी उपस्थित होते.
प्रा.एल.जी. सोनवणे पुढे म्हणाले की, चौकटीतले शिक्षण न घेतलेल्या बहिणाबाईंचे समाजाविषयीचे आकलन अतुलनीय होते. याच आकलनातून त्यांनी आपल्या कवितेत दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्नांवर, रूढी-परंपरांवर भाष्य केले आहे.
डॉ. राजेंद्र अहिरे यांनी, कवयित्री बहिणाबाईंच्या साहित्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याचे नमूद केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने रूपांतरित होणे हा बहिणाबाईंचा व साहित्याचा सन्मान आहे.याप्रसंगी त्यांनी बहिणाबाईंची ‘घरोट’ ही कविता सादर केली. काव्यवाचनाच्या कार्यक्रमात डॉ ज्योती वाकोडे, प्रा.सचिन वाघ, डॉ.पी.एस. साळुंखे, डॉ.चंद्रकांत कढरे, गायत्री सोनवणे यांनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या.
सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रकाश साळुंखे यांनी तर आभार प्रा.विश्वास भामरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. लहू पवार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी परिश्रम घेतले.