धुळे : कोराेनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प होते. या ३ महिन्यातील थकीत वीज बिल नागरिकांना माफ केले जाईल, या आशेवर अनेकांनी वीज बिलाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ७१ कोटी थकले आहे. तर एक हजार ग्राहकांचा आतापर्यत वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
कोरोनामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार महावितरणने ग्राहकांचे घरोघरी जाऊन रीडिंग न घेता, मार्च ते जून हे तीन महिने सरासरी बिले दिली. मात्र, महावितरणने दिलेली बिले अवाजवी असल्याचे सांगत, अनेक ग्राहकांनी महावितरणकडे तक्रारी करून बिलाचा भरणा करण्यास विरोध दर्शविला. ग्राहकांच्या वीजबिलाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात येत असल्याने, महावितरण प्रशासनाने जळगाव परिमंडळात सर्वत्र तक्रार निवारण शिबिरे घेतली. यामध्ये अनेक ग्राहकांच्या वीजबिलाबाबत तक्रारींचे निवारण करण्यात आले. मात्र, तरी देखील अनेक ग्राहकांनी अद्यापही वीजबिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात थकबाकीचा आकडा तब्बल १३०० कोटींच्या वर जाऊन पोहचला आहे.
थकबाकी वसूल करण्याबाबत महावितरण प्रशासनाने गेल्या महिन्यापासून जोरदार वसुली मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत तब्बल १३०० ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, १ हजार ४६० ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
दररोज शंभर ग्राहकांचा
वीजपुरवठा खंडित
धुळे शहर विभागात कृषी ग्राहक वगळता अन्य ग्राहकांनी ७१ कोटी ५१ लाख रुपये वीज बिल थकवले आहे. शहरातील राेजदर १०० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केेला जात आहे. त्यानुसार आठ दिवसात एक हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी सूचना दिली जात आहे.
अशी आहे महानगरातील थकबाकी
व्यवसायिकांसह घरगुती बिलाची वसुली करण्यासाठी कर्मचाऱ्यांना उदिष्टे देण्यात आले आहे. ७१ कोटी रुपये थकीत रकमेत ग्राहकांकडे तब्बल ७१ कोटी ५१ लाख रुपये वीजबिल थकले आहे. त्यात ७१ हजार ७५० घरगुती ग्राहकांकडे २५ कोटी ७ लाख रुपये तर व्यावसायिक २ हजार ७११ ग्राहकांकडे ४ कोटी ५४ लाख, औद्योगिक ५६२ ग्राहकांकडे २ कोटी ११ लाख, पथदिव्यांचे २४ कोटी १९ लाख, पाणीपुरवठ्यांतर्गत २१० ग्राहकांचे १५ कोटी १७ लाख रुपये, सार्वजनिक क्षेत्रातील २८२ ग्राहकांकडे ४३ लाख रुपये वीजबिल थकले आहे.