धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत असून भाजप-शिवसेना युती व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यात लढत होत आहे. सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ़ सुभाष भामरे हे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात असून त्यांची लढत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्यासोबत होत आहे. सोबतच लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार अनिल गोटे यांच्यासह एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.संपूर्ण प्रचारादरम्यान ‘मोदी’ सरकार केंद्रबिंदू राहिले. युतीने मोदी सरकारच्या यशोगाथा तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, वंचित बहुजन आघाडीने मोदी सरकारच्या अपयशाचे पाढे मतदारांसमोर वाचले. यावेळी प्रचारात आक्रमकपणा दिसून आला नाही तर मतदारांच्या गाठीभेठी व कॉर्नर मिटिंगवर सर्वच उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात भर दिला. निवडणुकीचा प्रचार रविवारी संध्याकाळी संपला. अखेरचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांची मतदारांच्या गाठीभेठीसाठी तारांबळ उडाली होती. आता मतदानापर्यंत मुका प्रचार सुरू राहणार असून मतदारांचा कौल मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.पोलिंग पार्टी उद्या रवाना होणारमतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलिंग पार्टीला (मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी) सोमवारी ईव्हीएम बॅलेटसह सर्व साहित्याचे वितरण केले जाईल. विधानसभानिहाय करण्यात आलेल्या स्ट्राँग रुम परिसरात साहित्याचे वितरण करण्यात येईल. सर्व पोलिंग पार्टी दुपारपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचतील. मतदानाची व्यवस्था करतील आणि तसा अहवाल सादर करतील.सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’मतदान केंद्रावर सकाळी ६ वाजता मॉक पोल घेण्यात येईल. यात सर्व उमेदवार व नोटांसह ५० मत टाकण्यात येतील. हे मॉक पोलिंग एजंटच्या उपस्थितीत होईल. यासाठी पोलिंग एजंटला कुठल्याही परिस्थितीत सकाळी ६.१५ वाजेपर्यंत मतदान केंद्रात पोहोचावे लागेल. ते न आल्यास मॉक पोल सुरू केले जाईल. ते ७ वाजेपर्यंत चालेल. ७ वाजेपासून मतदानास सुरुवात होईल.
निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या तिरंगी लढत होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:09 IST