शिरपूर : केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयातर्फे ७ वी आर्थिक गणनेला शहरात सुरूवात झाली असून नागरिकांनी आपल्या कुटुंबाची तसेच आर्थिक उपक्रमांची व्यवसायांची खरी माहिती आलेल्या प्रगणकास देवून सहकार्य करण्याचे आवाहन येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे़१ ते १५ डिसेंबर दरम्यान शहरात आर्थिक गणना केली जाणार आहे़ त्याची सुरूवात येथील आऱसी़पटेल उर्दु शाळा प्रभाग क्रमांक ६ पासून करण्यात आली़ आर्थिक गणनेच्या समितीत जिल्हाधिकारी संजय यादव हे समितीचे अध्यक्ष असून जिल्हा सांख्यिकी अधिकारी हे जिल्हा सदस्य सचिव तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल हे सदस्य म्हणून कार्यरत आहे़ या सर्व अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली शहरात या आर्थिक गणनेचे कामकाज सुरू करण्यात आले आहे़केंद्र सरकारला विविध बाबीसंदर्भात धोरण ठरविण्यासाठी आवश्यक आकडेवारी उपलब्ध व्हावी म्हणून आर्थिक गणना करण्यात येते़ निरनिराळे लघुउद्योग, सेवा लघु निर्मिती संस्था, आर्थिक उपक्रम इत्यादी अर्थव्यवस्थेतील वाटा असून त्यात कार्यरत असलेले कामगार तसेच गुंतवणूक, यंत्रसामुग्री इत्यादीचा समग्र अभ्यास होण्याच्या दृष्टीने त्याची मुलभूत माहिती एकत्रीत करणे हा अािर्थक गणनेचा महत्वाचा उद्देश आहे़ सदर गणनेचा कालावधी १ ते १५ डिसेंबर असणार आहे़ त्यासाठी नोडल अधिकारी भाईदास देविदास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सैय्यद जाकीर सैय्यद नुर, प्रमोद मराठे यांचे पथक माहिती घेत आहे़ संपूर्ण शहरात या सर्व्हेसाठी प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ शहरातील नागरिकांना सुचित करण्यात येते की, आपल्या कुटुंबाची तसेच आर्थिक उपक्रमांची व्यवसायाची खरी माहिती प्रगणकास देवून सहकार्य करावे़ एका महत्वाच्या राष्ट्रीय उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल व नोडल अधिकारी भाईदास मोरे यांनी केले आहे़
शिरपुरात आर्थिक गणनेला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 21:59 IST