धुळे : कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले असताना त्याचा फटका कमी-अधिक प्रमाणात उद्योजकांनाही बसलेला आहे़ हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत असलेतरी उत्पादन कमी असल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे़ मागणीही घटली आहे़ कामगारांसह उद्योजक आरोग्याची काळजी घेत आहेत़कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असताना देशात लॉकडाऊन करण्यात आला़ त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्य आणि जिल्हा पातळीवरुन होऊ लागली होती़ गर्दीचे सर्वच ठिकाणे बंद केल्यामुळे त्याचा फटका हा उद्योजकांनाही सोसावा लागला़ सलग दोन महिने उद्योगधंदे हे बंद असल्यामुळे त्यांच्याकडून उत्पादीत होणारा माल हा ठप्प झाला होता़ हाताला काम नाही म्हणून उद्योगात काम करणारे मजुरांनाही आपल्या घरचा रस्ता धरावा लागला़ सलग दोन महिन्यांपासून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे शहरानजिक अवधान एमआयडीसी येथील सर्वच लहान मोठे २२७ उद्योग हे बंदस्थितीत होते़ या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे उत्पादन झालेले नव्हते़ही स्थिती गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून सारखीच होती़ अशातच लॉकडाऊनचा काळ थोड्याफार प्रमाणात शिथील करण्यात आला़ टप्प्याटप्प्याने सर्वच व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात करण्यात आली़ नंतरच्या काळात काही अटी आणि शर्थींवर एमआयडीसीमधील उद्योग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली़ त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत धुळ्यातील अवधान एमआयडीसी येथील लहान-मोठे उद्योग सुरु करण्यात आले आहेत़ सद्याच्या स्थितीत उद्योगांना सुरुवात झाली असलीतरी त्यांना थोड्याफार प्रमाणात मजुरांची टंचाई जाणवत आहे़ आहे त्या मजुरांमध्ये आपल्या कंपनीमार्फत मालाचे उत्पादन घेण्याचा कटू प्रसंग सध्या धुळ्यातील उद्योजकांवर येऊन ठेपलेला आहे़अवधान एमआयडीसी येथील जे उद्योग सुरु झाले आहेत त्यात काही ठिकाणी ५० तर काही ठिकाणी ७५ टक्के क्षमतेने मालाचे उत्पादन घेतले जात आहे़ त्यांच्याकडे माल वाहतुक करण्यासाठी आवश्यक असणारी जी काही साधने उपलब्ध असलेतरी वाहतुकीचे दर वाढल्यामुळे दळण-वळणात उद्योजकांना काही प्रमाणात अडचणी येत आहेत़ त्यावर देखील मात करण्यासाठी व्यावसायिकांचा पाठपुरावा सुरु आहे़ उत्पादन सुरु असलेतरी काही प्रमाणात का असेना त्यांच्याकडे कामगारांचा, मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे़ काही उद्योग हे एक दिवसाआड सुरु आहेत़ मालाची मागणी घटल्याने विक्रीवर परिणाम होत असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी सांगितले़
उत्पादन कमी असल्याने विक्रीवर परिणाम तरीही अल्प मजुरांवर उद्योजक घेताय आता उंच भरारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:00 IST