शिंदखेडा तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत होता.
त्यामुळे तालुक्यातील शेतकरी समाधानी होता. या वर्षी जून महिन्यात थोडाफार पाऊस झाला. त्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने दिलेली ओढ व वाढलेल्या उन्हामुळे पेरणी केलेले बियाणे वाया गेले. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळे लागले आहेत. तालुक्यात खरिपाचे १ लाख ११ हजार ८०० हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट होते; मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी पावसाचा पत्ता नाही. काही भागात थोडाफार पाऊस झाला. झालेल्या पावसाच्या आधारावर ३८ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ३८ टक्के आहे. परंतु पावसाने दडी दिल्याने पेरलेले वाया गेले आहे. अजून ६२२६० हेक्टरवरील शेतात पावसाअभावी शेतातील ढेकळेही फुटली नाहीत. जर दोन-तीन दिवसानंतर ही पाऊस आला तरी त्याचा खरिपावरील पिकाच्या उत्पन्नात ५० टक्के घट येणार असल्याचे जाणकार शेतकरी सांगत आहेत
तालुक्यात कापूस लागवडीचे ७० हजार ७३५ असून पैकी ३३०४२ हेक्टरवर लागवड झाली.ऊस २५० पैकी ४४ हेक्टरवर लागवड, कडधान्य ७४२९ पैकी १६०७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
मंडळनिहाय झालेली पेरणी अशी
शिंदखेडा मंडळात २७७४५ पैकी ६९२४, नरडाणे मंडळात २४६६२ हेक्टर पैकी १५३५५ हेक्टरवर पेरणी झाली आहे,तर चिमठाणे मंडळात २३६५५ हेक्टरपैकी ७३२४ व दोंडाईचा मंडळात २५११८ पैकी ९३१९ हेक्टरवर पेरणी झाली आहे .