महापालिका व ठेकेदाराच्या समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना नाहक अपघातास सामोरे जावे लागत आहे. खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्ती करण्यासाठी अनेकवेळा नागरिकांनी मनपा प्रशासनाला निवेदनही दिले आहेत. मात्र, दखल घेणारा अधिकारी नसल्याने नागरिकांच्या समस्यांना वाली कोण? असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे.
अशा आहेत समस्या
देवपूर भागातील बिजली नगर, रामनगर, भिवसन नगर भागात आजही गटारीची व्यवस्था मनपाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे काॅलनी भागातील सांडपाणी रस्त्यावर येऊन चिखल होतो. बाराही महिने सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या ठिकाणी गटार होणे अपेक्षित असताना मनपाकडून या काॅलनी भागाकडे दुर्लक्ष केले जात आहेत, तर पाटील नगरात भूमिगत गटारी काम होऊन बरेच दिवस झालेले असतांना खडी टाकून रस्ते बुजण्यात आलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खडी विखुरलेली असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
जमनागिरी रस्त्याची दुरवस्था
आयकर भवनाकडून जमनागिरी फाशीपूलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला चार महिन्यांपूर्वी गटार तयार केली आहे. या कामासाठी रस्ता खोदण्यात आला होता. त्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असताना मनपाकडून अद्याप या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे दररोज काॅलनी भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावर मातीचे ढीग पडून
देवपुरातील सुदर्शन काॅलनीत अनेक दिवसांपासून जलवाहिनीचे काम अपूर्ण पडले आहेत. त्यामुळे खडीचे ढीग रस्त्यावर पडलेले आहे. या ठिकाणी रुग्णालय असल्याने अनेकांना अडचण निर्माण होते.