दोंडाईचा शहरात यावर्षी श्री दादा गणपती, श्री बाबा गणपती, वीरभगतसिंग उत्सव, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ, रॉयल सरकार, जैन ड्युड्सचा राजा, गोपालपुरा गणेश मंडळ, श्री संत रोहिदास गणेशमित्र सह सुमारे ४८ सार्वजनिक मंडळे व २ खासगी अशा ५० ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय सुमारे २ हजार ३०० घरगुती स्वरूपात गणेशाची स्थापना झाली आहे. गणेशोत्सव काळात दोंडाईचात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते .सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने दोंडाईचात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. शहरात दोन मुख्य मूर्तिकार असून येथून ६ फुटांपासून १५ फुटांपर्यंत उंचीचा गणेशमूर्ती बाहेरगावी पाठविल्या जात होत्या. त्यामुळे यात लाखोंची उलाढाल होत होती. परंतु यावर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत असल्याने जास्तीत जास्त चार फुटापर्यंत गणेश मूर्ती साकारल्या आहेत.
दोंडाईचात पाचव्या दिवशी तीन, सातव्या दिवशी ३५, नवव्या दिवशी ५, अनंत चतुर्थदशीला ५ गणपतींचे विसर्जन होणार आहे.
दोंडाईचात विसर्जनच्या दिवशी श्री दादा गणपती,श्री बाबा गणपती व श्री विरभगतसिंग या तिन्ही मनाचा गणपतीची आझाद चौकात भेट होते.
या भेटीला हरिहर भेट होते. परंतु कोरोनाचा सावटामुळे गेल्या वर्षापासून हरिहर भेट होत नाही. त्यामुळे गणेशभक्तांत नाराजी जाणवत आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी गणेशोत्सवसाठी जादा पोलीस कुमक मागविली आहे.