धुळे : शेतात पेरणी करण्याच्या वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना भोकर शिवारात शनिवारी घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाल्याने १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
गोंदूर रोड, भोकर येथे राहणारे अविनाश विश्वनाथ पाटील यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास भाेकर गावाच्या शिवारात गोपीचंद बुधा पाटील, बारकू बुधा पाटील, भिकन बुधा पाटील, आशुतोष गोपीचंद पाटील, सागर बारकू पाटील, अमोल बारकू पाटील, किशोर भिकन पाटील (सर्व रा. भोकर, ता. धुळे) यांनी तुम्ही शेतात पेरणी कसे करता असे म्हणत वाद घातला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात अविनाश पाटील यांचा भाऊ प्रशांत विश्वनाथ पाटील याला लाठ्या काठ्यांनी, लाेखंडी राॅडने मारहाण करण्यात आली. यात प्रशांत जबर जखमी झाला आहे. यावरून सातही जणांविरुध्द भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
तर दुसऱ्या गटाकडून सागर उर्फ बारकू हरिश्चंद्र देवरे (२५, रा. भोकर, ता. धुळे) याने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, तुम्ही शेतात काम करु नका असे सांगण्याचा राग आल्याने वडील हरिश्चंद्र बुधा देवरे यांना अविनाश विश्वनाथ पाटील, प्रशांत विश्वनाथ पाटील, विश्वनाथ ओंकार पाटील, बेबीबाई विश्वनाथ पाटील, रोहिणी विश्वनाथ पाटील आणि अविनाशचा शालक (सर्व रा. भोकर, ता. धुळे) यांनी हातातील लोखंडी शिंगाडे, लाठ्या काठ्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या सर्वांविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक एम. एच. सय्यद घटनेचा तपास करीत आहेत.