यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नववीचा निकाल दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदानाचे सूत्र ठरविण्यात आले होते. त्यानुसार निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली.
राज्य शासनाने १५ जुलै रोजी दहावीचा निकाल लागणार असल्याचे जाहीर केल्याने, विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली होती.
धुळे जिल्हा दुसऱ्या स्थानी
राज्य शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार धुळे जिल्ह्याचा निकाल ९९.९८ टक्के लागला असून, नाशिक विभागात जिल्हा द्वितीयस्थानी आहे. प्रथमस्थानी नंदुरबार जिल्हा असून, तिसऱ्या व चौथ्यास्थानी अनुक्रमे नाशिक व जळगाव जिल्हा आहे.
दहावीला २८ हजार ५६५ विद्यार्थी प्रविष्ट
धुळे जिल्ह्यातून दहावीसाठी २८ हजार ५६५ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी २८ हजार ५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेेले आहेत, तर केवळ चार अनुत्तीर्ण झाले.
मुली-मुलांची टक्केवारी सारखीच
जिल्ह्यातील १६ हजार ११६ पैकी १६ हजार ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची उत्तीर्णची टक्केवारी ९९.९८ आहे, तर १२ हजार ४४९ पैकी १२ हजार ४४७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेल्या असून, त्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारीदेखील ९९.९८ टक्के आहे.