लोकमत न्यूज नेटवर्कनेर : नेरसह परिसरातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी फक्त पाच पोलीस कर्मचारी दिमतीला आहेत. त्यामुळे वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गावातील व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.नुकतेच रुज़ू झालेले जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडीत हे याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धुळे तालुक्यातील नेर हे सुरत-नागपुर महामार्गावरील मोठे बाजारपेठेचे गाव आहे. परिसरात लहान मोठी सोळा गावे आहेत. सामाजिक आणि राजकीय दृष्टीने हा परिसर संवेदनशील आहे. तरीही नेरला केवळ पोलीस दूरक्षेत्र आहे. या पोलीस दूरक्षेत्रच्या हद्दीत नेर, भदाणे, नवे भदाणे, खंडलाय खु, खंडलाय बु, खंडलाय बांबुर्ले, शिरधाणे, अकलाड, मोराणे, लोणखेडी, लोहगड, उभंड, नांद्रे, देऊर खुर्दे, देऊर बुद्रुक, पिंपरखेड ही खेडी जोडलेली आहेत. दूरक्षेत्र असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यात एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस कॉन्स्टेबल असे पोलीस कर्मचारी असल्याने त्या कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारचे सण, निवडणुका, कायदा सुव्यवस्था, अतिमहत्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्त, यात्रा, महामार्ग, रात्रीची गस्त, गुन्हे तपास, चौकशी अर्ज, शालांत परीक्षा बंदोबस्त, समन्स बजावणे, अकस्मात मृत्यूची चौकशी, वायरलेस, महामार्गावरील अपघात, वेगवेगळ्या दैनंदिन कामांचा ताण पडत आहे. नेर व परिसरात जवळजवळ एक लाखावर नागरीक राहतात. पोलीस कर्मचारी फक्त पाच आहेत. ते पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे नेरला स्वतंत्र पोलीस स्टेशन मिळावे, आशी अपेक्षा नविन आलेल्या धुळे जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडीत यांच्याकडे नेर व परिसरातील नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.
नेर येथे नवीन पोलीस ठाण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:13 IST