धुळे : आदिवासी भील समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक उन्नतीसाठी तसेच सुरक्षेसाठी स्वतंत्र भील प्रदेशाची आवश्यकता असून भील प्रदेश राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी करीत भील प्रदेश मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी धुळ्यात निदर्शने केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. भील समाज पुरातन काळाच्या पूर्वीपासून या भूमीचा मूलनिवासी आहे. भील समाजाचे राज्य कटकारस्थान रचून हिरावण्यात आले होते. त्यामुळे या समाजाचा विकास झाला नाही. समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र भील प्रदेश राज्याची आवश्यकता आहे. राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही आदिवासीबहुल राज्ये आहेत. या राज्यांतील डोंगरी भागाच्या अखंड पट्ट्यात आदिवासी भील समाजाचे आजही बहुसंख्येने वास्तव्य आहे. त्यामुळे स्वतंत्र भील प्रदेश निर्मितीला परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निदर्शने करताना सुरेश भील, सुनील ठाकरे, शंकर भील, दीपक भील, बापू भील, संजू भील, भटू भील, अशोक भील, अनिल भील, विशाल भील, विजय भील, अनिल भील, श्याम भील, अर्जुन भील, अशोक गायकवाड, समाधान भील, शरद भील, भगवान भील, ज्ञानेश्वर भील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.