नेर परिसरात मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली होती. वेळवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणी, लागवड करण्यास घाई केली. बियाणे बऱ्यापैकी उगवले असताना अचानक पडलेला पावसाचा खंड हा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. कापूस, बाजरी, सोयाबीन, मका, तूर, आदी मुख्य पिकांचा पेरा करण्यात आला आहे. मात्र पावसाने ओढ दिल्याने ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी आता पिकांना वाचविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे अशी सोय नाही, अशा कोरडवाहू शेतकऱ्यांना नितांत पाण्याची गरज आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडल्यास पिके तग धरू शकतील आणि शेतकऱ्यांचे नुकसान टळेल; म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश बोढरे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे क्षेत्र गोळा करून मागणी करण्याचे सांगितले. त्यामुळे त्वरित उजव्या कालव्याचा लाभ होणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलून मागणी करणार असल्याचे डॉ. बोढरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पिके वाचविण्यासाठी अक्कलपाडा धरणातून उजव्या कालव्यातून त्वरित पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST