रमेश बोहरा यांना पाच मुली व एक मुलगा अशी एकूण सहा अपत्य आहेत. ते मूळचे अक्कलकुवा येथील रहिवासी आहेत. त्यापैकी स्नेहा (२२) ही द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे तर प्रेरणा (१९) ही बारावी वाणिज्य शाखेत आहे. या दोघी बहिणींची जैन भागवती दीक्षा २० ऑक्टोबर रोजी राजस्थानमधील नोखा येथे होणार आहे. नोखा येथे ज्ञानगच्छाधिपति परमपूज्य श्रुतधर प्रकाश मुनी यांचा चातुर्मास सुरु आहे. त्यांच्या उपस्थितीत या भगिनी दीक्षा ग्रहण करणार आहेत. दरम्यान, सत्कारावेळी दीक्षार्थी प्रेरणा व स्नेहा यांनी सांगितले की, गुरु कधीही कुणाचे अहित करत नाही. त्यांची वाणी ऐकून वैराग्य आले. भौतिक सुख हे कधीही शाश्वत नसते, ते क्षणिक असते. जे कायम राहत नाही, ते सुख कसले. संसाराची असारता, क्षणभंगुरता पाहून अलौकिक आनंद प्राप्त करण्यासाठी संयम घेत आहे. या सत्कारावेळी दीक्षार्थी प्रेरणा व स्नेहा यांचे वडील रमेश बोहरा, आई निर्मला बोहरा, चुलत बहीण सेजल बोहरा व जावई कुशल बेद उपस्थित होते. त्यासोबतच शिंदखेड़ा श्री संघाचे अध्यक्ष प्रवीण पारख, सचिव रमेश कर्णावट, प्रा. चंद्रकांत डागा, खुशालचंद ओस्तवाल, मनोहर पारख, अशोक राखेचा, सजनराज कवाड, बाबूलाल कर्णावट, सुरेश गिडिया, दिलीप कर्णावट, रोशन टाटिया, अक्षय बाफना, राकेश कर्णावट आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डागा यांनी केले तर संजय पारख यांनी आभार मानले.
दीक्षार्थी बोहरा भगिनींचा जैन स्थानकात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST