महापालिकेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात मंगळवारी सकाळी महासभा घेण्यात आली. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, उपायुक्त गणेश गरी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. महापौर सोनार यांच्या कार्यकाळातील अडीच वर्षपुर्ण झाल्याने सुरवातील सत्ताधारी व विराेधी पक्षातील नगरसेवकांनी महापौरांचे आभार व्यक्त करीत शुभेच्छा दिल्यात.
यावेळी नगरसेवक हर्षकुमार रेलन म्हणाले की, मार्केट भीषण स्वरूपाची आग लागल्याने तातडीने मदतीची अपेक्षा होती. मात्र आग विझविण्यासाठी मनपाकडे केवळ एकच बंब असल्याने दुसरा बंब पाणी भरून येई पर्यत आगीचे रौद्ररूप धारण केले होते.अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाण्याचा पाईप देखील धरता येत नव्हता. त्यामुळे भाजपाच्या काही कार्यकर्ते मदतीसाठी पुढे आल्याने आग विझविण्यासाठी मदत झाली. मनपाच्या अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर पाणी मारता आले नाही. मनपा अग्निशामक विभागाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आल्याचा आरोप महासभेत नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी केला.
लोकमत प्रसिध्द केलेला मुद्दा गाजला
मनपा अग्निशमन कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
शंकर मार्केटला आग लागल्यावर सुरवातीला अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. माद्ध आग विझविण्याचे धाडस कर्मचाऱ्यांकडून झाले नाही. कारण कर्मचाऱ्यांकडे शिडी नव्हती, पायात बुट,ड्रेस, गॉलल्स नसल्याने कर्मचारी अशा प्रसंगात धाडस कसे करणार? असा सवाल देखील महासभेत उपस्थित झाला.
महासभेत १३ विषयांना मंजुरी
महासभेत विषयपत्रिकेवर १३ विषय विषय पत्रिकेवर ठेवण्यात आले होते. त्यापैकी सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली. यात काही नगरसेवकांच्या प्रभागात अडीच वर्षात कामे झालेले नाही किंवा मागणी करण्यात आलेली आहे. अशांना प्राधान्य देण्यात आले होते.
महापौरांची शेवटची महासभा
महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर प्रथम महापौर हाेण्याचा मान चंद्रकांत सोनार यांना देण्यात आला. महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ ३० जूनला संपत असल्याने महापौर सोनार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी शेवटची महासभा झाली.
महापौर पुत्रांचे वडिलांसाठी पहिले भाषण चर्चेत
अडीच वर्षाच्या कार्यकाळात विकास कामांच्या मुद्यावर अनेक सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृह डोक्यावर घेतले होते. मात्र महापोैर पुत्र तथा नगरसेवक देवेद्र सोनार यांनी एकाही विषयावर महासभेत मुद्दा मांडला नाही. मंगळवारी महापौर सोनार यांच्या कार्यकाळातील शेवटचा दिवस असल्याने सभागृहातील सर्व नगरसेवकांनी बोलण्याचा आग्रह केल्यावर नगरसेवक देवेंद्र सोनार यांनी वडिलांनी संघर्षातून दिवस काढले आहेत. महापौर पदाचा मान भाजपाकडून मिळाला व सत्ताधारी व विरोधकांची देखील अडीच वर्षाच्या कार्यकाळात साथ मिळाली त्याबद्दल सोनार यांनी आभार मानले.
दुधवाल्यानंतर आता म्हैसवाल्याला संधी
भाजपाची सत्ता आल्यानंतर महिला उपमहापौर होण्याचा मान कल्याणी अंपळकर यांना मिळाला. अंपळकर यांचा व्यवसाय दुध विक्रीचा आहे. तर नवनियुक्त उपमहापौर भगवान गवळी यांचा व्यवसाय म्हैस विक्रीचा आहे.त्यामुळे उपमहापौर दुधवाल्यानंतर आता म्हैसवाल्याला मिळाल्याने नगरसेवकांनी मस्करी उडवली.