धुळे - कोरोना, डेंग्यूची लक्षणे काहीशी सारखीच असतात. त्यामुळे त्रास होत असेल तर दुखणे अंगावर काढणे धोकेदायक ठरू शकते. कोरोना व डेंग्यू या दोन्ही आजारामध्ये लवकर उपचार घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे तत्काळ चाचणी करणे महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मात्र पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढत असल्याने डेंग्यूचे रुग्ण वाढतात. तसेच डेंग्यू व कोरोना दोन्हीमध्ये ताप, अंगदुखी आदी लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे चाचणी करून घ्यावी.
अंगदुखी व ताप
- कोरोना व डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये ताप जास्त प्रमाणात येतो तसेच अंगदुखीचा त्रास होतो.
- कोरोनामध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण अधिक असते डेंग्यूमध्ये मात्र सर्दी खोकला होत नाही. झालाच तर प्रमाण कमी असते.
- डेंग्यूमध्ये डोळे दुखतात. कोरोनाच्या काही रुग्णांमध्येही अशी लक्षणे आढळली आहेत.
- डेंग्यू या आजारात सांधेदुखीचा तीव्र त्रास जाणवतो.
पाणी उकळून प्या
- पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे आजार बळावतात, म्हणून पाणी उकळूनच प्यावे.
- जिल्ह्यातील जलस्रोतांची आरोग्य विभागाने तपासणी केली होती. त्यात १३ गावांतील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले होते.
- पाणी उकळून पिले तर डायरिया, गॅस्ट्रो याप्रकारचे त्रास होत नाहीत.
कोरडा दिवस पाळा
पावसाळ्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असते. तसेच विषाणूचत बदल होतो. विषाणूचा बदल रोखणे आपल्या हातात नाही. पण परिसर स्वच्छ ठेवल्यास डासांची उत्पत्ती आपण रोखू शकतो. गच्चीवरील टायर, भंगार वस्तू यात पाणी साठू देऊ नये. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा.
- डॉ. अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी
चाचणी कुठली
कोरोना - आरटीपीसीआर
डेंग्यू - इलायझा
डेंग्यूचे रुग्ण
२०१९ - २३३
२०२० - ६२
२०२१ - ६८