गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. हा संसर्ग वाढू नये, म्हणून प्रथमच देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. कोरोना व लॉकडाऊनचे नियम पाळण्यासाठी आरोग्य व पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. या दोन्हींच्या मदतीला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. ज्या शिक्षकांच्या हाती खडू आणि पुस्तके पाहिजे, त्या शिक्षकांच्या हाती लॉकडाऊनच्या काळात थर्मामीटर, ऑक्सिमीटर आले. दंडुका आला. ज्या गावात बाधित रुग्ण आढळत होते, त्या गावात जाऊन शिक्षकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसह जाऊन बाधितासह त्याच्या कुटुंबाची माहिती संकलित केली. त्याचे तापमान मोजले. एवढेच नाही, तर जिल्हाबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांसोबत महामार्गावरही ड्युटी केली. एकंदरीत आरोग्य व पोलीस यंत्रणेप्रमाणेच शिक्षकांनीही आपले योगदान दिले आहे. एवढेच नाही, तर रेशन दुकानांवरही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती.
दरम्यान, कोरोनाची सेवा बजावत असतांना शिक्षकांनाही कोरोनाने घेरले. यात काहींचा बळीही गेला. दरम्यान धुळे जिल्ह्यात ३३ शिक्षकांचा बळी गेल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखताना फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास, त्याच्या परिवाराला ५० लाखांचे विमा संरक्षण, सानुग्रह अनुदान देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. फ्रंटलाइनवर आरोग्य, पोलिसांसोबत शिक्षकांनीही काम केले आहे. त्यामुळे ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी होत आहे. मात्र, आतापर्यंत तरी एकाही शिक्षकाला या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.
कोरोना ड्युटीवर असलेल्यांनाच मदत
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ज्या शिक्षकांचा मृत्यू झालेला आहे, त्या सर्वांना सरसकट सानुग्रह अनुदान मिळणे शक्य नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या शिक्षकांची जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी या सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी आदेशासह नियुक्ती करण्यात आली होती, त्यांनाच सानुग्रह अनुदानाची मदत मिळू शकते. मात्र, जिल्ह्यात कर्तव्यावर असताना किती शिक्षकांचा मृत्यू झाला, याची अद्याप स्पष्ट आकडेवारी शिक्षण विभागाकडे नाही.
कोरोनामुळे ज्या शिक्षकांचा मृत्यू झाला, त्यांना सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे. यासाठी जिल्हा परिषदेने शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्याची गरज आहे. प्रस्ताव अद्याप न पाठविल्याने शिक्षक मदतीपासून वंचित आहेत.
- राजेंद्र पाटील,
जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती, धुळे
धुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मयत झालेल्या शिक्षकांची संख्या जास्त आहे. कोरोनामुळे मयत झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये विमा कवच देऊन मदत द्यावी, तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांना अनुकंपावर सेवेत घ्यावे.
- शिवानंद बैसाणे, जिल्हाध्यक्ष, समन्वय समिती, धुळे
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना ५० लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. या अनुदानासाठी जे पात्र त्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावेत.
- भूपेश वाघ