तालुक्यातील दोंडवाड येथेही ग्रामपंचायत निवडणूक झाली. या ठिकाणी ग्रामविकास पॅनल व विकास पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली. सोमवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात ग्रामविकास पॅनलने सातपैकी एक जागा बिनविरोध तर सहा जागांवर सरळ लढतीत विजय मिळविला. विकास पॅनलला पराभव पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये मनीषा प्रमोद पाटील व सुनीता रवींद्र बिराडे यांच्यात लढत झाली. मनीषा पाटील या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र निकालानंतर पराभवाची कसलीही खंत मनात न ठेवता मनीषा पाटील यांनी सर्वच विजयी उमेदवरांना आपल्या घरी बोलावून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दोंदवाड येथे निवडणूक काळात राजकीय वातावरण नेहमीच तणावात असते असे सांगितले जाते; मात्र मनीषा व प्रमोद या सुशिक्षित जोडप्याने पराभव आनंदाने स्वीकारत विद्यमान विजयी उमेदवार यांचा यथोचित सत्कार केला. असे उदाहरण दुर्मीळ, पण कौतुकास्पद असल्याने सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी त्यांच्या या कामाची प्रशंसा केली आहे. आजच्या परिस्थितीत निवडणूक निर्णय असाच मान्य करून आपापसात सद्भाव जागवला पाहिजे.
पराभूताकडून विजयी उमेदवारांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST