जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नवीन २३ एलईडी पथदिवे बसविण्यात येत आहेत. जुने पथदिवे काढून त्याठिकाणी नवीन उंचीला अधिक व प्रखर प्रकाशाचे हे दिवे असल्याने रात्रीच्या वेळेस संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून निघणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्युत विभागाने हे काम हाती घेतले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात इतरही अनेक शासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस शुकशुकाट असते. तसेच अंधाराचेही साम्राज्य असते. त्यामुळे कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण हाेता. जिल्हाधिकारी कार्यालयाने बांधकाम विभागाला नवीन पथदिवे बसविण्याबाबत पत्र दिले हेाते. त्यानुसार परिसरात नवीन २३ एलईडी पथदिवे बसविण्याचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे यासाठी भूमिगत विद्युत वाहिनी टाकली जात आहे. तसेच लाेखंडी पाेल आणि इतर साहित्य आणले आहे. येत्या चार दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली. ग्राहक मंच, माहिती भवन, नियाेजन भवन, जुने प्रशासकीय संकुलातील इतर शासकीय कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पथदिवे फायदेशीर ठरणार आहेत. अनेकदा अधिकारी- कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. त्यामुळे या पथदिव्यांचा प्रकाश महत्त्वाचा ठरणार आहे.
एलईडी दिव्यांनी उजळणार जिल्हाधिकारी कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST