साईलीलानगर येथील गार्डनमध्ये वृक्षसंवर्धन समितीने मागील वर्षी १०० झाडांची लागवड केली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने झाडांना पाण्याची आवश्यकता असते. वृक्षसंवर्धन समितीचे सदस्य झाडांना पाणी देण्यासाठी जातात. त्याचेच अनुकरण ही चिमुकली मुले करीत आहेत. या चिमुकल्यांनी ८ मुलांचा ग्रुप बनविला आहे. यात रोहित विनोद चौधरी, वैष्णवी विनोद चौधरी, आदित्य योगेश चौधरी, भावेश देवीदास मराठे, मयूर कैलास कोळी, कुणाल कैलास कोळी, मयूर वासुदेव पाटील, कृष्णा सचिन पाटील ही चिमुकली मुले नियमित झाडांना पाणी देतात. ७ ते १३ वयोगटातील ही मुले आहेत. ना कोणती प्रसिद्धी ना कोणते हेवेदावे निःस्वार्थ हेतूने झाडांना पाणी देण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे.
एक, दोन नाही तब्बल १०० झाडांना पाणी देतात.
सोशल मीडियावर या लहान मुलांचे कार्य आणि झाडे जगविण्याची धडपड ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. कोरोनाच्या काळात कृत्रिम ऑक्सिजन मिळविण्यासाठी लोकांची धावपळ होत आहे. मात्र, आयुष्यभर ऑक्सिजन देणारी झाडे ही चिमुकली मुले जगवीत आहेत. त्यांच्या या कार्याचे परिसरातील रहिवाशांसह अनेकांनी कौतुक केले आहे.