कोरोनामुळे गेल्यावर्षी दहावी बोर्डाच्या परीक्षेचा केवळ एकच पेपर रद्द करावा लागला होता. यावर्षी तर पूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे अकरावीचे प्रवेश कसे होणार? विद्यार्थ्यांना मिळालेले गुण कसे समजणार हा प्रश्न आहे.
जिल्ह्यात यावर्षी जवळपास २५ हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ होणार होते. दहावीत उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे असतो. विज्ञान शाखेसाठी गुणवत्ता यादी जाहीर होत असते. त्यानुसारच विद्यार्थ्यांचा कनिष्ठ महाविद्यालयात नंबर लागत असतो. यावेळी तर परीक्षाच रद्द झाल्याने, गुणांचा प्रश्नच नाही. धुळे जिल्ह्यात ११वीसाठी तब्बल २६ हजार एवढी प्रवेशक्षमता आहे. मात्र आता शासनाने ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा विचार करीत आहे. मात्र विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांचे मूल्यांकन कशा पद्धतीने होणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
दहावीनंतर अनेक विद्यार्थी तांत्रिक व्यवसाय अभ्यासक्रमाला प्राधान्य देत असतात. असे विद्यार्थी दहावीनंतर तंत्रनिकेतन, आयटीआयला प्रवेश घेत असतात. या दोन्ही ठिकाणी दहावीच्या गुणांवरच प्रवेश मिळत असतो. आता परीक्षाच नाही तर केवळ सीईटीवर प्रवेश मिळणार.
ॲानलाईन सीईटी झाली तर ग्रामीण भागाचे काय?
ग्रामीण भागात नेटच्या पुरेशा प्रमाणात सुविधा नाहीत. नेटअभावी अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी आल्या होत्या. अशातच ॲानलाइन सीईटी परीक्षा झाल्यास त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऑफलाइन झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढेल
सीईटीची ऑफलाइन परीक्षा झाल्यास, एकाच केंद्रावर अनेक विद्यार्थी एकत्र येतील, यात एखादा बाधित असल्यास त्याची लागण इतरांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
अंतर्गत मूल्यमापन कसे होणार?
यावर्षी दहावीचे वर्ग ऑनलाइनच झालेले आहेत. सहामाही परीक्षा झालेली नाही. तर केवळ प्रिलियम परीक्षा झालेली आहे. काही ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा झालेली आहे. या दोन परीक्षांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना गुण मिळणार का?असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असल्याने, सर्व विद्यार्थी पास असतील. पण पुढील वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटीद्वारेच प्रवेश मिळेल.विद्यार्थ्यांचा अभ्यास नसला तरी त्या परीक्षेतूनच पुढील प्रवेश होणार आहे.
- अविनाश देवरे,
शिक्षक, पिंपळनेर
सीईटी ही पात्रता परीक्षा असली तरी ती प्रत्येक वर्गासाठी घेतली जात असते. विद्यार्थ्याला गुण किती मिळाले हे माहिती नसले तरी भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठी सीईटी फायदेशीर ठरेल हे निश्चित.
- आशिष कुंवर,
शिक्षक, पिंपळनेर
अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण ऑनलाइन झाल्याने अनेक विद्यार्थी आपले मत नोंदवू शकले नाहीत. सीईटी घेणे म्हणजे ऑफलाइन परीक्षा घेणे आहे. कोरोनाच्या काळात ही परीक्षा घेणे अडचणीचे ठरेल. - बी.सी.सोनार,
शिक्षक, दोंडाईचा