येथील साक्री रोडवरील बालगृहाला नाशिक महिला बालविकास विभागाचे उपायुक्त सी. डी. पगारे यांनी नुकतीच भेट दिली. बालकल्याण समितीच्या प्रत्येक सदस्याशी वैयक्तिक कामाबाबत चर्चा केली.
यावेळी नाशिक महिला बालविकासचे डीपीओ अनिल भोये, धुळ्याचे महिला बालविकास अधिकारी हेमंत भदाणे उपस्थित होते. बालकल्याण समितीच्या कामाची पद्धत समजून घेतली. कोरोना काळात बालकल्याण समिती सदस्यांनी तालुकानिहाय काम वाटून घेतले होते. आपापल्या तालुक्यात कोरोनाकाळात निराधार झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्या बालकांपर्यंत पोहोचण्याचे काम बालकल्याण समिती व बालसंरक्षण कक्षाने केले. जिल्ह्यात ४०९ बालकांचा शोध घेण्यात आला. या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. महिला बालविकास अधिकारी हेमंत भदाणे यांनी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळवून दिले.
प्रा. वैशाली पाटील यांना जाणीवपूर्वक विचारपूस करून प्रशासकीय कामात काही अडचणी असतील त्या मांडण्याच्या सूचना केल्या. महिला बालविकास विभागात तुम्ही समुपदेशनाचे मोठे कार्य उभारू शकता. तुम्हाला मोठे व्यासपीठ मिळेल. तुमच्या समाजहिताच्या कामाची दखल घेतली जाईल, अशा शब्दांत त्यांनी प्रोत्साहन दिले.
प्रा. डॉ. सुदाम राठोड यांच्यासोबतही सकारात्मक चर्चा केली.
यावेळी बालकल्याण समिती सदस्या प्रा. वैशाली पाटील, महिला बालविकास अधिकारी हेमंत भदाणे, बालगृह अधीक्षिका अर्चना पाटील, बालसंरक्षण अधिकारी सतीश चव्हाण यांनी उपायुक्त सी. डी. पगारे यांचा सत्कार केला.