धुळे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात घरफोडीचे सत्र सुरु असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. रात्रीची पोलिसांची गस्त सुरु असता देखील चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत. इतकेच नाहीतर आता दिवसा देखील चोरटे हातसफाई करु लागले आहेत.देवपुरातील गवळे नगरात सुरेश साळुंखे यांच्या घरातून दागिन्यांसह रोकड चोरट्याने लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी सायंकाळी उशिरा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. देवपुरातील गवळे नगरातील प्लॉट नंबर ४७ मध्ये सुरेश रामदास साळुंखे (६२) यांचे निवासस्थान आहे. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून ते कुठेतरी बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी चोरट्याने साधली आणि दरवाजाचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करीत संसारोपयोगी साहित्याचे नुकसान केले. घरात काही सापडते का याचा शोध सुरु केल्यावर ३ लाख ७० हजाराचा ऐवज चोरुन घेतला. त्यात, १ लाख २५ हजाराची ५ तोळ्याची सोनपोत, ८७ हजार ५०० रुपये किंमतीची साडेतीन तोळ्याची पोत, ३७ हजार ५०० रुपये किंमतीचा दीड तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, २० हजार रुपयांची ८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी, १२ हजार ५०० रुपये किंमतीचे कानातील टॉप्स, ५ हजार रुपयांची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम सोन्याचे अन्य दागिने आणि ७० हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.साळुंखे हे दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती त्यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिली.माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्या पाठोपाठ श्वान पथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरा सुरेश साळुंखे यांनी दिलेल्या फियार्दीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सततच्या होणाऱ्या घरफोडीमध्ये पोलीस निरीक्षकांसह प्रांताधिकारी, वकील, डॉक्टर, दुकानदार, व्यापारी, सर्वसामान्य नागरीक सर्वच भरडले जात आहे.परिणामी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर खापर फोडले जात आहे. परिणामी चोरट्याने पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
धुळ्यात पावणेचार लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:57 IST