धुळे : सोनगीर शिवारात इस्टेट ब्रोकर यांच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करुन अत्यंत बारकाईने छडा लावला़ यात गुजरात येथील संशयित कृष्णा गेंदालाल सोमानी आणि राजू उर्फ विहांग त्रिवेदी यांना शिताफिने अटक केली़ दोन वर्षापासून सुरु असलेले खुनाचे प्लॅनिंग हाणून पाडण्यात यश आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते़ दोंडाईचा रस्त्यावरील सोनगीर शिवारात हॉटेल धनश्रीच्या पुढे गुजरात येथील इस्टेट ब्रोकर गोपाल मोतीलाल काबरा यांची निर्घुन हत्या ३० मे रोजी पहाटे झाली होती़ या खून प्रकरणातील काबरा यांची पत्नी कंचन काबरा हिने सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला होता़ घटनेचे गांभिर्य ओळखून तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि कर्मचाºयांनी घटनास्थळाचे अवलोकन केले़ खून हा लूट प्रकरणातून झाला नसल्याचे लक्षात आले़ तपास कामासाठी दोन स्वतंत्र पथक तयार करुन एक पथक गुजरातकडे तर दुसरे मध्यप्रदेशकडे रवाना करण्यात आली़ खून प्रकरणाचा तपास सुरु असतानाच संशयित राजू उर्फ विहांग बिपीनचंद्र त्रिवेदी (रा़ अटलदरा, बडोदा, गुजरात) हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर झाला असता त्याची कसून चौकशी करण्यात आली़ गुन्ह्यातील मयत गोपाल काबरा याचे आणि संशयित राजू त्रिवेदी यांच्यात अहमदाबाद जिल्ह्यातील राजपिपला व बावला येथील जमिनीच्या व्यवहारापोटी राजू त्रिवेदी याच्याकडे शिल्लक असलेल्या रकमेइतके म्हणजेच १० कोटी रुपयांचे हिरे व्यवहार पूर्ण करण्यासाठी गोपाल काबरा यास घेण्यास बोलाविले़ ३० मे रोजी पहाटे अडीच वाजेच्या मुहुर्तावर हिरे देण्याची बतावणी करुन यातील संशयित कृष्णा गेंदालाल सोमानी (रा़ बडोदा) याने सोनगीर येथील नंदुरबार चौफुलीवर हजर राहून ललित, विजय पटेल आणि एक अज्ञात यांच्या मदतीने गोपाल काबरा याला सोनगीर शिवारातील दोंडाईचा रोडवर हॉटेल धनश्रीच्या पुढे नेवून त्याच्या डोक्यात काहीतरी अवजड हत्याराने वार करुन खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे़ खुनाची घटना नेमकी जमिनीच्या व्यवहारातून झाली आहे की अनैतिक संबंधातून याचा उलगडा पोलीस करीत आहेत़
यांनी घेतले परिश्रमपोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उप अधीक्षक संदिप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मांडेकर, हनुमान उगले, राम सोनवणे, अनिल पाटील, महाले, हेड कॉन्स्टेबल संदिप थोरात, सुनील विंचुरकर यांच्यासह कर्मचारी प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, अशोक पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, गौतम सपकाळे, राहुल सानप, वसंत पाटील, मायूस सोनवणे, विशाल पाटील, तुषार पारधी, चेतन कंखरे, नितीन मोहने, विलास पाटील यांनी परिश्रम घेतले़
अत्यंत हुशारीने आणि गुणात्मक शोध लावला आहे़ खुनाच्या गुन्ह्याचा शोध माझ्या करियरमधील सर्वोत्तम आहे़ कोणतेही धागेदोरे नसतानाही तपास लावल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेला १५ हजाराचे रिवार्ड देण्यात येत आहे़- विश्वास पांढरेपोलीस अधीक्षक, धुळे़