धुळे : साक्री तालुक्यातील मालनगाव आणि शिरपूर तालुक्यातील जोयदा या दोन ठिकाणच्या वेगवेगळ्या घटनेत दोघांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यात एका तरुणाचा समावेश असून पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील मालनगाव शिवारात काशिनाथ उत्तम ठाकरे (५३) यांचे शेत आहे. या शेतात काशिनाथ ठाकरे यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. यानंतर त्यांचे कुटुंबिय शेतात आले असता त्यावेळी काशिनाथ हे बाभळीच्या झाडाखाली झोपलेले होते. त्यांना त्रास जाणवत असल्यामुळे कुटुंबियांनी अत्यवस्थ परिस्थितीत त्यांना दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दुसऱ्या घटनेत शिरपूर तालुक्यातील जोयदा गावातील रतिलाल टेमक्या पावरा (२१) या तरुणाने त्याच्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सुरुवातीपासूनच गंभीर होती. उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.
मालनगावसह जोयदा येथे दोघांनी केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 21:47 IST