धुळे : आता कोरोनाची लस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर रक्तदान करता येणार आहे. त्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे नोडल अधिकारी व रक्तपेढीप्रमुख डॉ. दीपक शेजवळ यांनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त महानिर्देशक डॉ. सुनील गुप्ता यांच्या पत्रानुसार आता लस घेतल्यानंतर १४ दिवसातच रक्तदान करता येणार आहे.
याआधी लस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नव्हते. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण सुरू झालेले आहे. रक्तदान करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या जास्त असते. त्यामुळे ज्या तरुणांनी लस घेतली आहे, त्यांना रक्तदान करण्यासाठी आता २८ दिवस थांबायची गरज नाही. लस घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर ते रक्तदान करू शकणार आहेत. येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात धुळे जिल्ह्यासोबतच नंदुरबार व जळगाव येथून थॅलेसेमियाचे रुग्ण उपचारासाठी येतात. थॅलेसेमियाचे रुग्ण व इतर शस्त्रक्रियांसाठी रक्ताची मोठी गरज भासते. मात्र लसीकरण सुरू झाल्यापासून रक्ताची चणचण भासत आहे. महाविद्यालयाकडून विविध शासकीय विभागात लसीकरण शिबिराचे आयोजन केले जाते व रक्त संकलन केले जाते. मात्र फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या टप्प्यात लसीकरण झाल्याने रक्ताची चणचण वाढली होती. मात्र ज्या कर्मचाऱ्यांना लस घेऊन १४ दिवस झाले आहेत, त्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
केवळ ५० बॅग उपलब्ध -
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी संध्याकाळपर्यंत रक्ताच्या केवळ ५० बॅग उपलब्ध होत्या. त्या पुढील तीन दिवस पुरतील. तसेच शिबिरातून काही बॅग उपलब्ध होणार आहेत. महिन्याला सुमारे ६०० बॅग रक्ताची आवश्यकता भासते. लसीकरण सुरू झाल्यानंतर रक्तसंकलन घटले असल्याची माहिती मिळाली.
प्रतिक्रिया -
लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येणार आहे. त्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पत्र प्राप्त झाले आहे. सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. रक्तदान करण्यासाठी सामाजिक संस्था व तरुणांनी पुढाकार घ्यावा.
- डॉ.दीपक शेजवळ, रक्तपेढीप्रमुख, हिरे वैद्यकीय महाविद्यालय