धुळ्यात भाजपाला मिळालं बहुमत; मात्र पक्षांतर करणाऱ्या १४ नेत्यांना जनतेने नाकारले, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:29 IST2026-01-19T12:28:59+5:302026-01-19T12:29:37+5:30

एका बाजूला पक्षांतर करणाऱ्या अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला असताना दुसरीकडे ९ अशा उमेदवारांनी बाजी मारली आहे ज्यांच्यासाठी पक्षांतराचा निर्णय 'लॉटरी' ठरला

BJP got majority in Dhule; But the people rejected the 14 leaders who change party before election | धुळ्यात भाजपाला मिळालं बहुमत; मात्र पक्षांतर करणाऱ्या १४ नेत्यांना जनतेने नाकारले, कारण...

धुळ्यात भाजपाला मिळालं बहुमत; मात्र पक्षांतर करणाऱ्या १४ नेत्यांना जनतेने नाकारले, कारण...

धुळे - महापालिका निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याची मोठी कसोटी लागली होती. निवडणुकीच्या तोंडावर 'सोयीचे राजकारण' करत तंबूत शिरलेल्या उमेदवारांना मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. यात पक्ष बदलून नशीब आजमावणाऱ्या ९ उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला असला तरी १४ जणांना मात्र पराभवाची नामुष्की सोसावी लागली आहे.

शहरातील १९ प्रभागातील ७० जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपामध्ये ५५० इच्छुक होते. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नेत्यांना उमेदवारी देतांना तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यात ऐनवेळी पक्षप्रवेश घेतलेल्या इच्छुकांना उमेदवारी मिळाल्याने नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी करीत ऐनवेळी तंबू बदलत पक्षांतर केले. त्यात भाजपात आलेल्या ९ जणांना फायदा झाला तर १४ प्रमुख उमेदवारांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली आहे. मतदारांनी या आयाराम-गयारामां'ना नाकारल्याचे चित्र या निकालावरून दिसून येत आहे.

मतदारांनी यांना स्वीकारले

एका बाजूला पक्षांतर करणाऱ्या अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला असताना दुसरीकडे ९ अशा उमेदवारांनी बाजी मारली आहे ज्यांच्यासाठी पक्षांतराचा निर्णय 'लॉटरी' ठरला. या उमेदवारांनी नवीन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवूनही मतदारांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवले आहे. काहींनी मूळ पक्षाला सोडचिठ्ठी होता. या बदलाबद्दल राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते, मात्र मतदारांनी त्यांच्यावर विजयाचा गुलाल उधळून सर्व शंकांचे निरसन केले आहे.

उमेदवारांच्या पराभवाची कारणे अशी...

महायुती न होण्याचा निर्णय ऐनवेळी समजल्याने तयारीला कमी वेळ मिळाला. घाईगडबडीत जनसंपर्क अधिक असणारे, तगडे उमेदवार निवडता आले नाहीत. भाजपा वगळता इतर पक्षांच्या राज्यस्तरावरील एकाही बड्या नेत्याची सभा झालेली नाही. काही प्रभागांत उमेदवारांना पुरस्कृत करावे लागले. प्रचारात संपूर्ण वॉर्ड पिंजून काढताना कसरत झाली. भाजपाकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीची भिती होती तर भाजपाला तोडीस तोड सक्षम उमेदवार देण्यासाठी विरोधकांनी वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली. अवघ्या काही तासांची मुदत असताना भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बंडखोरीला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे कमी कालावधीत मतदारापर्यंत नवीन पक्ष, चिन्ह पोहचवण्यास कमी वेळ मिळाला. 

दरम्यान, निवडणूक जाहीर होताच अनेक मातब्बर नेत्यांनी आणि आजी-माजी नगरसेवकांनी आपली निष्ठा बदलून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. सत्तेच्या लाटेवर स्वार होऊन विजय सुकर होईल अशी या उमेदवारांची अटकळ होती. मात्र धुळ्याच्या मतदारांनी अत्यंत चोखंदळपणे मतदान करत हे स्पष्ट केले की केवळ पक्ष बदलणे म्हणजे विजयाची हमी नव्हे. ९ उमेदवारांसाठी पक्षांतराचा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला. १४ जणांसाठी तो राजकीयदृष्ट्या घातक ठरल्याचे दिसून येते. 

Web Title : धुले में भाजपा जीती, पर दल बदलने वाले 14 नेता हारे।

Web Summary : धुले में भाजपा को सफलता मिली, पर चुनाव से पहले दल बदलने वाले कई नेताओं को मतदाताओं ने नकार दिया। नौ को फायदा हुआ, पर चौदह हारे, जिससे पता चलता है कि मतदाताओं को अवसरवाद पसंद नहीं। कम तैयारी का समय भी हार का कारण बना।

Web Title : BJP wins Dhule, but voters reject 14 party switchers.

Web Summary : Dhule voters favored BJP but rejected many who switched parties before elections. While nine gained from defection, fourteen faced defeat, showing voters dislike opportunism. Limited preparation time also contributed to losses.