धुळे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने साक्री तालुक्यातील छडवेल येथील एका घरातील शेडमध्ये छापा टाकून विना परवाना ६५ लाख ३० हजार रुपयांचा विदेशी दारुचा साठा वाहनांसह जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने अवैध मद्य तस्करी विरोधात गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई केली आहे.६ डिसेंबर रोजी हॉटेल नवरंग नाव असलेल्या घर वजा शेडमध्ये साक्री तालुक्यातील छडवेल शिवारात छापा टाकला. विविध कंपन्याचा दारुचा साठा वेगवेगळ्या बॉक्समध्ये आढळून आला. त्याची मोजणी केली असता ६५ लाख ३० हजार रुपये किंमतीचा हा मुद्देमाल भरारी पथकाच्या हाती लागला. याप्रकरणी पथकाने संशयित मुकेश अरुण चौधरी (रा. अनकवाडे म्हसावद ता.शहादा जि. नंदुरबार) याला अटक केली. त्याच्या विरोधात दारुबंदी अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.ही कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक आर. एम. फुलझळके, विशेष भरारी पथकाचे निरीक्षक एम. बी. चव्हाण आणि त्यांच्या सोबत एस. एस. रावते, डी. एन. पोटे, गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाशिक उपायुक्त अजुर्न ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते घटनेचा तपास करीत आहेत.
नाशिकच्या भरारी पथकाने पकडली साक्री तालुक्यात ६५ लाखांची दारु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 19:38 IST