भूषण चिंचोरे
धुळे : शहरात सर्वच भागांत डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळत आहेत. खोलगल्ली, जुने धुळे, साक्री रोड, मिल परिसर तसेच देवपुरातील कॉलनी परिसरातही डेंग्यूचे थैमान सुरू असून आतापर्यंत शहरात एकूण २७८ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे.
डेंग्यूसोबतच चिकनगुनियाचे संशयित रुग्णही वाढले आहेत. तरीही आरोग्य विभाग निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. फक्त नावालाच काही ठिकाणी धुरळणी, फवारणी केली जात आहे. आपल्या परिसरात डास होऊ देऊ नका, असे सांगत सर्व जबाबदारी नागरिकांवर सोपवून आरोग्य विभाग मोकळा झाला आहे. तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या अनेक रुग्णांनी डेंग्यूची रॅपिड टेस्ट केली आहे. त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तरीही प्रशासन त्यांना डेंग्यूचे रुग्ण मानायला तयार नाही. जर इलायझा ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तरच त्याची डेंग्यूचे रुग्ण म्हणून नोंद केली जात आहे. त्यामुळे खासगीत उपचार घेत असलेल्यांच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी दिसत आहे.
रोज किमान १५ पेशंट
डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. दररोज किमान १५ ते २० संशयित रुग्णांची भर पडत आहे. तसेच रॅपिड टेस्ट ग्राह्य धरण्यात आली तर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दुप्पट होईल. पण इलायझा टेस्ट पॉझिटिव्ह आली तरच त्या रुग्णाची नोंद डेंग्यूच्या रुग्णांमध्ये केली जाते.
लहान मुलांचे प्रमाण जास्त
- डेंग्यूच्या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. खासगी तसेच शासकीय रुग्णालयांच्या ओपीडीत तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्येदेखील लहान मुलांची संख्या अधिक आहे.
- मलेरिया व इतर साथीच्या आजारांनीही डोके वर काढले आहे.
काय आहेत लक्षणे?
डेंग्यू -
- डेंग्यूमध्ये डोळे दुखतात. तसेच थंडी वाजून येणे, ताप, अंगावर लाल पुरळ आदी लक्षणे दिसतात. काही रुग्णांना डोकेदुखी व थकवा जाणवतो.
चिकनगुनिया -
चिकनगुनियाचे प्रमुख लक्षण ताप आहे. तापासोबतच सांधेदुखीही अधिक असते. तसेच मळमळ, पुरळ, डोकेदुखी आणि थकवा अशी लक्षणे दिसतात.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे डेंग्यूच्या डासांचे प्रमाण वाढले आहे. गच्चीवरील विविध वस्तू, टायर, भंगार साहित्य यामध्ये पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा.
- डॉ. अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी
सात वर्षीय मुलाचा मृत्यू
साक्री रोड परिसरात राहत असलेला सात वर्षीय डेंग्यू संशयित वेद सूर्यवंशी या बालकाचा बुधवारी मृत्यू झाला. मात्र रॅपिड टेस्ट ग्राह्य धरत नसल्याने त्याचा मृत्यू डेंग्यूने झाला, असे मानायला आरोग्य प्रशासन तयार नाही. चाचण्यांचा गोंधळ दूर होण्याची गरज आहे.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण
डेंग्यू - ६८
चिकनगुनिया - ०
कावीळ - २७