आॅनलाइन लोकमतधुळे :जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशाच्या अन्यभागातही हातपाय पसरविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे आरोग्यासह विविध यंत्रणा खडबडून जाग्या झालेल्या आहेत. यात शहरातील शाळाही मागे नाहीत. शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छता व कोरोना आजाराविषयी व घ्यावयाच्या काळजीविषयी माहिती देवून जनजागृती केली जात असल्याचे सांगण्यात आले.गेल्या काही महिन्यापासून चीनमध्ये ‘कोरोना’विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. देशातही आतापर्यंत २८ कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. त्यांच्या मार्फत जनजागृती करण्यात येत आहे. या यंत्रणांसोबतच शहरातील सर्वच शाळांमध्ये आता ‘कोरोना’विषयी माहिती देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील झेड.बी.पाटील महाविद्यालयात ‘कोरोना’ आजारावर आधारित पोस्टर प्रदर्शन भरवून या आजाराची लक्षणे व घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. लहान मुलांमध्ये प्रतिकार क्षमता कमी असते. या पार्श्वभूमिवर शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही विशेष काळजी घेण्यात येत आहे. शहरातील कमलबाई कन्या शाळेत बालमंदिर ते १२वीपर्यंत तब्बल साडेपाच ते सहा हजार विद्यार्थिनी शिक्षण घेतात. याशाळेत स्वच्छतेवर भर दिला जातोय. तसेच विज्ञान शिक्षक कोरोनाविषयी जनजागृती करतायेत. सध्या परीक्षेचे दिवस असल्याने शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती कमी असली तरी त्याठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे.केंद्रीय विद्यालयाला केंद्रीय विद्यालय संघटन दिल्ली तर्फे एक पत्रक आले असून त्या ‘कोरोना’विषयी घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. शाळेत हातधुणे, टिश्युपेपर वापरणे आदी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच हात धुण्यासाठी साबणही उपलब्ध करून दिले असल्याचे प्राचार्या अर्चना श्रीवास्तव यांनी सांगितले.
शाळेत स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर दिला जातोय. तसेच विज्ञानाचे शिक्षक प्रत्येक वर्गात ‘कोरोना’विषयी माहिती देवून जनजागृती करीत आहेत.-मनिषा जोशी,मुख्याध्यापिकाकमलाबाई कन्या शाळा, धुळे