यावर्षी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून दमदार पाऊस झाला असून, पीक स्थिती बरोबरच पाणी टंचाईचीही समस्या सुटली आहे. सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचाही सर्वत्र उत्साह आहे. श्रावण महिना सुरू होताच गणरायाच्या आगमनाची चाहूल लागलेली होती. गेल्या आठ-दहा दिवसांपासून मोठ-मोठ्या सार्वजनिक मंडळांतर्फे मंडप उभारणी, आरासचे काम सुरू होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी मंडप उभारणीचे काम सुरू होते. सर्वांनाच प्रतीक्षा होती ती ‘श्रीं’च्या आगमनाची लागली होती़
गणरायाच्या स्वागतासाठी गेल्या दोन दिवसांपासूनच बाजारपेठ सजली होती. शहरातील विविध भागात मूर्ती विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते. त्यामुळे गणेशोत्सवाची वातावरण निर्मिती झालेली होती. शुक्रवारी सकाळपासूनच बाजारपेठा गजबजून गेलेल्या होत्या. जसजशी वेळ वाढत होती, तसतशी बाजारात गर्दी वाढत होती. धुळे शहरात संतोषी माता चौक ते कमलाबाई कन्या हायस्कुल पर्यंतच्या रस्त्यावर तसेच फुलवाला चौक, जुन्या आग्रारोडवर महात्मा गांधी चौक ते पारोळा रोडवर सिग्नल चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मूर्ती तसेच पूजा साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली होती. त्यामुळे या रस्त्यांवर चालायलाही जागा नव्हती. गणेश भक्तांच्या गर्दीमुळे रस्ते फुलून गेले होते.
बच्चे कंपनीचा उत्साह प्रचंड
गणपतीची मूर्ती घेण्यासाठी पालकांसोबत असलेल्या लहान मुलांचा उत्साह दांडगा होता. त्यांच्या चेहºयावर गणेशोत्सवाचा आनंद दिसून येत होता. अनेक लहान मुले मूर्ती मोठी पाहिजे असा आग्रह पालकांजवळ धरत होते. तसेच काहींनी भगवे कपडे परिधान केलेले होेते. मूर्ती खरेदी झाल्यानंतर गणरायाचा जयजयकार करण्यास ही बालके विसरली नाहीत. डोक्यात टोपी घालून पाटावर गणपतीची मूर्ती ठेवून बालके घराकडे मार्गस्थ होत होती.
ढोलताशांच्या निनादाने शहर दणाणले
जुन्या आग्रारोडवर ढोलताशांची पथके सज्ज होती. गणेशमूर्तीची खरेदी होताच ती स्थापनेच्या ठिकाणी नेण्यासाठी ढोलताशांच्या निनादात लगबग सुरू व्हायची. तरूण कार्यकर्ते नृत्य करीत, तसेच गुलाल व फुलांची उधळण करत श्रींच्या मूर्तीसह मार्गस्थ होत होते.
बाजारपेठेला आले यात्रेचे स्वरूप
मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी अनेकजण परिवारासह बाजारपेठेत दाखल झाल्याने फुलवाला चौक, संतोषी माता चौक, जुना आग्रारोडला यात्रेचे स्वरूप आलेले होते. बाजारपेठेत गर्दी असली तरी गणेशभक्तांचा उत्साह तुसभरही कमी झालेला नव्हता. या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले होते. अनेक ठिकाणी विधीवत पूजा करूनच श्रींची स्थापना करण्यात आली. एकेका पुरोहितांकडे अनेक मंडळाच्या श्रींच्या स्थापनेचे काम असल्याने, त्यांना धावपळ करावी लागल्याचे चित्र दिसून आले़ गणेशोत्सवानिमित्त मूर्ती, आरास साहित्य, पूजा साहित्य आदींच्या खरेदीतून लाखोंची उलाढाल झाली.
पोलिसांचा बंदोबस्त
गणपती आगमनानिमित्त अनेक मंडळांतर्फे मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.