धुळे : शहराच्या मालेगाव रोडवर असलेल्या एका बारदानाच्या गोदामात मंगळवारी सकाळी मालकाने अगरबती लावून पुजाअर्चा केली. त्याच अगरबतीची ठिणगी अचानकपणे बारदानावर पडल्याने बारदानाने पेट घेतला हे लक्षात आले तोपर्यंत हळूहळू आगीने रौद्र रुप धारण केले. गोदाम मालक जयंत पाखले व मजूर अरुण पाटील या दोघांचा आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात गंभीररित्या भाजल्याने आणि आगीचा धुर नाकातोंडात जाऊन जीव गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. आग विझविण्यासाठी जेसीबीच्या मदतीने गोदामाची भींत पाडण्यात आली. शेवटी महापालिकेच्या अग्नीशमन बंबाच्या तीन फेऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
शहरातील मालेगाव रोडवर रेल्वे क्रॉसिंगच्या थोडं पुढे गेल्यावर शनिमंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागे दीपक शर्मा यांनी गोदाम बांधले असून ते भाडयाने दिले आहेत. यातील एक गोदाम बारदानचे व्यापारी जयंत बाळकृष्ण पाखले (४६) रा. प्लॉट नं.१, पार्वतीनगर, दूध डेअरी समोर यांनी भाडयाने घेतले आहे. या गाेदामात विकत घेतलेले साखरेचे, कांद्याचे व अन्य धान्याचे रिकामे बारदान ठेवलेले असतात. गोदामातील बारदान व्यवस्थित घडी करुन वेगवेगळे ठेवण्यासाठी पाखले यांनी कर्मचारी लावले आहे. मंगळवारी सकाळी जयंत पाखले हे नेहमी प्रमाणे गोदाम उघडल्यानंतर अगरबती लावून देवपुजा केली. देवपुजा झाल्यावर कामास सुरुवात झाली.
अगरबतीने केला घात - गोदाम मालक पाखले हे नेहमीच अगरबती गोदामबाहेर लावतात. पण मंगळवारी सकाळी त्यांनी अगरबती गोदामात लावली. सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक अगरबत्तीची ठिणगी बारदानवर पडली. हळूहळू बारदानने पेट घेतला. पण ते लवकर कोणाच्याही लक्षात आले नाही. पण जेव्हा आग वाढली आणि त्याठिकाणाहून धूर निघू लागला तेव्हा गोदामात आग लागल्याचे लक्षात आले. तेव्हा महापालिकेच्या अग्नीशमन विभागाला त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. अग्निशामक बंब येतो तो पर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न करण्यासाठी गोदाम मालक जयंत पाखले (४६) आणि त्यांचा कर्मचारी अरुण पाटील (६०) रा. अरिहंत भवन मागे, वाखारकर नगर हे गोदामात आत गेले. गोदामात बारदानानी पेट घेतल्याने प्रचंड धूर झाला होता. त्यामुळे आगीत आणि धुरामुळे दोघांनाही तेथून बाहेर निघणे कठीण झाले हाेते. ते दोघेही गंभीररित्या भाजले आणि धुर नाकातोंडात गेल्याने जीव गुदमरल्याने खाली पडले होते. अग्निशामक दल त्याठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्या दोघांना बाहेर काढून तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मयत घोषीत केले.
शेजारी मदतीला धावले - गोदामाच्या बाजूला असलेले गोदाम मालक अनिल मुंदडा यांच्या लक्षात आग लागल्याची बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने महापालिका अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अग्नीशमन बंबाला पाचारण केले. तो पर्यंत जेसीबीची मदत घेवून गोदामाची भींत पाडण्यात आली. अग्नीशमन बंब दाखल होताच बंबांने तीन फेऱ्या करुन आगीवर नियंत्रण मिळविले. शहर पोलिसांनाही घटनेची माहिती मिळताच पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
मयत गोदाम मालक जयंत पाखले यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. तर मजूर अरुण पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. शहर पोलीस ठाण्यात घटनेची अग्नी उपद्रव म्हणून नोंद करण्यात आली आहे.