कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरात अनेक विकास कामे खोळंबली होती; परंतु आता यातूनही मार्ग काढत बोरकुंड जिल्हा परिषद सदस्या शालिनी बाळासाहेब भदाणे यांच्या माध्यमातून विविध कामांना मंजुरी घेण्यात आली आहे. इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत विविध सुविधा पोहोचवण्याचे काम वर्षभरात करण्यात आले आहे.
या विकास कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत मांडळ फाटा ते मांडळ गाव या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणासह संगमस्थानाची दुरुस्ती करणे यासाठी २५ लाख, दोंदवाड फाटा ते दोंदवाड गाव रा. मा. क्रमांक १७ संगमस्थान दुरुस्तीसह डांबरीकरण करणे यासाठी २५ लाख, विंचूर फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ संगम स्थान दुरुस्तीसह डांबरीकरण करणे यासाठी रुपये २५ लाख व बोरकुंड रतनपुरा राज्यमार्ग क्रमांक १७ संगम स्थानासह पोहोच मार्ग दुरुस्ती करण्यासाठी रुपये ३० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला असून निविदा प्रक्रिया सुरू आहे.
मागील अनेक वर्षांपासून सदर कामे प्रलंबित होती व संबंधित गावकऱ्यांची मागणी याद्वारे पूर्ण झाली असून यापुढे देखील विकास कामे बाळासाहेब भदाणे यांच्या मार्गदर्शनात चालूच राहतील, असा आशावाद नयना पाटील यांनी व्यक्त केला.