धुळे - जिल्ह्यातील सुमारे ८ हजार जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोसच घेतलेला नाही. कोरोनाची लाट ओसरल्याने नागरिक बिनधास्त झाले असून लसीकरणाकडेही त्यांनी दुर्लक्ष केले आहे.
जिल्ह्यात सध्या कोव्हॅक्सिन व कोविशील्ड या दोन्ही लसींचा मुबलक साठा उपलब्ध आहे. पण लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी व कोविशील्ड लस घेतल्यानंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. मात्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने लसीकरणाचे गांभीर्य कमी झाल्याचे दिसत आहे.
नेमकी अडचण काय ?
सध्या कोरोना लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र लसीकरणासाठी होणारी गर्दी कमी झाली आहे. ज्यावेळेस कमी डोस शिल्लक होते त्यावेळेस लसीकरण केंद्रावर पहाटे पाच वाजेपासून रांगा लागत होत्या. आता मात्र कोरोनाची लाट ओसरल्याने भीतीही कमी झाली आहे.
दुसरा डोस घेणेही तितकाच आवश्यक
- कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या मागील महिनाभरापासून वाढली आहे.
- मात्र दुसऱ्या डोसकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. दुसरा डोस देखील पहिल्या डोस इतकाच महत्वाचा असून तो घेणेही आवश्यक आहे.
पहिल्या डोसइतकाच दुसरा डोस देखील महत्वाचा आहे. दुसरा डोस हा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करतो. दुसरा डोस घ्यायला काहीसा उशीर झाला तरी चालेल. पण दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. सध्या मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहेत.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी