जळगाव : परीक्षकांसमोर मॉडेल सादर करण्याची उत्सुकता आणि जास्तीत-जास्त दिवे पेटविण्यासाठीची स्पर्धकांमध्ये असलेली चुरस अशा उत्साहवर्धक वातावरणात विंड मिल चॅलेंज स्पर्धा पार पडली. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत पवनचक्कीद्वारे ६६१ एलईडी लाईट पेटविण्याचा विक्रम करण्यात आला आहे. यापूर्वी औरंगाबाद केंद्रावर ४५0 लाईट पेटविण्याचा विक्रम झाला होता.
अपारंपरिक ऊज्रेबद्दल समाजात प्रचार व प्रसार व्हावा. या ऊज्रेचे महत्त्व नागरिकांना कळावे व विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कुतूहल फाउंडेशन संडे सायन्स स्कूल, जैन ग्रीन एनर्जी व जैन इरिगेशनतर्फे गांधी जयंतीच्या पार्श्वभूमिवर विंड मिल चॅलेंज स्पर्धेचे गुरुवारी गांधी उद्यान येथे आयोजन करण्यात आले. तिसरी ते पाचवी, सहावी ते दहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत शहरातील सुमारे १३00 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संडे सायन्स स्कूलचे महेश गोरडे यांनी केले. यात त्यांनी स्पर्धेच्या आयोजनचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. प्रा. दिलीप भारंबे, प्रा. जसपाल भंगे, प्रा. मृणाल सराफ व प्रा. आर.ए. पाटील यांनी परीक्षण केले. संडे सायन्स स्कूलचे संचालक सुयश डाके, विद्यापीठाचे सहायक कुलसचिव ज्ञानेश्वर निलवर्ण,कोव्हर्ट फॉर बायोरिसर्च या पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील यावेळी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी नीलेश पांडव, रंजना बाभुळके, सिद्धार्थ पवार व ललित साळुंके यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे निकाल १९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. असे होते चॅलेंज
विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीला वाव मिळावा. त्यांनी संशोधनाकडे वळावे यासाठी संस्थेकडून विद्यार्थ्यांना डायनामो मोटर, एलईडी लाईट आणि वायरी देण्यात आल्या होत्या. त्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना घरी पवनचक्की तयार करायची होती. ही पनवचक्की सुरू झाल्यावर त्यावर जास्तीत-जास्त एलईडी लाईट प्रज्ज्वलित करायचे होते. यासाठी लागणारे पातेदेखील विद्यार्थ्यांना स्वत:च तयार करायचे होते.