धुळे : ई-बिजनेसच्या नावाखाली २१ लाखांची फसवणूक करणाऱ्या चौघांविरुध्द एका विमा प्रतिनिधीने तक्रार केली. त्यानुसार चौकशीअंती सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या कलमासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.उदय तोताराम वानखेडकर (५०, रा. पत्रकार कॉलनीच्या पाठीमागे, चंपाबाग, साक्री रोड धुळे) यांनी फिर्याद दाखल केली. ३१ मे २०१८ ते ३१ जानेवारी २०१८ या कालावधीत ई-बिजनेस कंपनी सुरु करुन ग्राहकांची फसवणूक केली. ई-बिजनेस कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत कंपनीचे प्लॅन विकून पैसा जमा केला. त्यांना एसएमएसद्वारे युजर आयडी आणि पासवर्ड देवून कंपनीची माहिती इंटरनेटद्वारे दाखविली. संगणकातील सॉफ्टवेअरद्वारे छेडछाड करुन माहितीत फेरफार केली. त्यानंतर कंपनीच्या स्थापनेच्या सहा महिन्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कंपनीची वेबसाईट बंद करुन ग्राहकांची सुमारे २१ लाखात फसवणूक केली.याप्रकरणी उदय वानखेडकर यांनी दाखल केलेल्या फियार्दीवरुन राखी किरण कुमावत, आशा अशोक सोनवणे, किरण धनराज कुमावत, अशोक काशिनाथ सोनवणे (सर्व रा. धुळे) या संशयितांविरुध्द भादंवि कलम ४१९, ४२०, २०१, ३४ आयटी ?क्ट २००० चे कलम ४३ (अ), ६५, ६६, ६६ (अ) (क) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख करीत आहेत.
धुळ्यात ई-बिजनेसच्या नावाखाली २१ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 22:16 IST