शिरपूर : येथील बसस्थानक पत्र्याच्या शेडमध्ये असून ते अत्याधुनिक होण्यासाठी अनेकदा प्रयत्न झालेत़ मात्र शासनातर्फे आता यासाठी ११ कोटी २१ लाख ६३ हजार रूपये बांधकामासाठी मंजूर झाले आहेत़ या कामाचे टेंंडर निघाले असून आचारसंहितेमुळे हे काम रखडले होते़ लवकरच या कामाला सुरूवात होईल, अशाी माहिती परिवहन खात्यातील बांधकाम विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर विनायक वळवी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितली़ यासाठी भाजपाचे तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी पाठपुरावा केला.शहरात एक अत्याधुनिक बसस्थानक असावे ही इच्छा असणारे डॉ़जितेंद्र ठाकूर यांच्या अथक प्रयत्न आणि पाठपुराव्याने बसस्थानकचा कायापालट होण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुमारे ११ कोटी २१ लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आंतरराज्य मापदंडानुसार शिरपूर बसस्थानकावर सर्व सुख सोईसुविधा उपलब्ध होणार आहेत. भाजपाचे तालुका प्रभारी डॉ़जितेंद्र ठाकूर यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे आॅगस्ट २०१८ ला भेट घेऊन शहरातील बसस्थानक हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त असावे अशी मागणी केली होती़ शिरपूर हे शहर गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांना जोडणारे असल्याने मोठ्याप्रमाणात तीनही राज्यातील नागरिक, व्यापारी यांची ये-जा असते. मात्र एवढे असून देखील शिरपूर बसस्थानक सुविधांअभावी दुर्लक्षित आहे. त्यामुळे येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणे अत्यावश्यक असल्याची मागणी करण्यात आली होती़त्यानुसार परिवहन मंत्र्यांनी धुळे जिल्ह्यात शिरपूरसाठी सर्वात जास्त निधी उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठे व सर्व सुविधायुक्त बसस्थानक मंजूर केले. नव्याने होणाया या बसस्थानकात मातांसाठी अत्याधुनिक असे हिरकणी कक्ष, महिला व पुरुष चालक वाहक यांच्यासाठी २ स्वतंत्र विश्रामगृह, आगार प्रमुख आणि कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय, आगार प्रमुख यांना निवासस्थान, प्रवाशांसाठी अत्याधुनिक आसन व्यवस्था व सुविधा, माहितीसाठी डिजिटल वेळापत्रक, विमातळाप्रमाणे गाड्यांची माहिती, पर्यावरण पूरक सुलभ शौचालय, प्रवाशांना थंडगार शुद्ध पाणी, लाईट, फॅनसह अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
*कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून या कामाची निविदा गेल्या मार्च महिन्यात प्रसिध्द झाली आहे़ त्या कामाचे टेंडर निघाले असून आचारसंहितेमुळे ते प्रलंबित पडले होते़ सदर काम धुळे येथील बांधकाम ठेकेदार एऩएम़ सोनवणे यांनी घेतले आहे. लवकरच या कामाचा शुभारंभ करण्याचे सांगण्यात आले आहे़.*मुंबई येथील वास्तु विशारद यांनी सुध्दा येथील बसस्थानकाच्या जागेची पाहणी करून लवकरच ते अत्याधुनिक प्रकारची डिझाईन तयार करीत असल्याची माहिती डॉ.ठाकूर यांनी दिली.*या बसस्थानकाची एकूण ५-६ एकर जागा असून खान्देशात सर्वात मोठी जागा असलेले हे बसस्थानक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.