तेरखेडा येथील रहिवासी ज्ञानोबा दत्ता खामकर हे लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यांना बहीण, भाऊ असे कोणीही नातलग नव्हते. त्यामुळे ते गावात एकटेच मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह भागवीत होते. तेरखेडा झोपडपट्टीमध्ये श्रीमंताना जागा मिळाल्या; परंतु, निराधार असलेल्या ज्ञानोबा खामकर यांना शासनाने व ग्रामपंचायतीने राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे ते गायरान जमिनीमध्ये पत्र्याची खोप (घर) करून ते राहत होते. कोणीही नातलग नसल्याने ते अविवाहित राहिले. गुऱ्हाळामध्ये काम करीत असताना त्यांच्या एका हाताची बोटे तुटली होती. यामुळे रोजगारही बंद झाला. तेव्हापासून शासनाकडून मिळणाऱ्या निराधार योजनेच्या पगारावर ते जीवन जगत होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर सोमवारी (दि. ५) त्यांच्या आयुष्याचा हा खडतर प्रवास संपला. ते निराधार असल्याने अंत्यविधी कुणी करायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, गावातील ज्ञानेश्वर फरताडे, शशिकांत राऊत, राम मोहिते, नारायण आसणे, काका पाैळ यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले.
तरुणांनी केले निराधार वृद्धावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST