लोहारा : दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढू लागल्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक नवे निर्बंध लागू केले आहेत. परंतु, यामुळे हातावर पोट असलेल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होत असून, याबाबत शहरातील काही व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता अगोदरच सात - आठ महिने व्यवसाय बंद राहिले. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही जागयचं कसं? असा सवाल या व्यावसायिकांनी व्यक्त केला.
वर्षानंतर पुन्हा मार्च महिन्यापासून कोरोनाने डोके वर काढले असून, कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत. सद्यस्थितीत तालुक्यात .... एवढे रुग्ण ॲक्टिव्ह असून, आतापर्यंत .... रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाबाबत व्यापाऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत असला तरी पुढे येऊन विरोध कोण करणार? असा प्रश्न व्यापाऱ्यांनाच पडला आहे. त्यात गेल्या वर्षी दुकान भाडे, वीजबिल, कामगारांच्या पगारी अंगलट आल्या. तसेच व्यापाऱ्यांनी बँक, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून काढलेले कर्जाचे वर्षभराचे हप्ते थकले. यामुळे मार्च एन्डच्या नावाखाली बँका, पतसंस्थेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वसुलीसाठी तगादा यामुळे व्यापाऱ्यांनी आता तरी व्यवसाय सुरळीत सुरु होईल म्हणून पैसे भरले. मात्र, एप्रिल उजडताच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा मिनी लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे जवळ असलेले पैसे हे बँकाचे थकलेले हप्ते भरले. आता दुकाने बंद झाल्यामुळे वर्षानंतर पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोट....
जिल्ह्यात इतर अत्यावश्यक आस्थापना सुरू आहेत. त्याप्रमाणे आम्हालाही कडक निर्बंध लावून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. आम्ही सर्व नियम पाळून व्यवसाय करू.
- साईनाथ गरड, भांडी व्यावसायिक
एक तर व्यवसायवर संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे. गेले वर्ष लॉकडाऊनमध्ये गेले. पुन्हा वर्षानंतर कोरोनामुळे दुकाने बंद झाली. त्यामुळे कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत काय करावे, हा प्रश्न आहे.
- बळीराम रणशूर, फूटवेअर व्यावसायिक
मागील वर्षभर व्यवसाय बंद होता. आता कुठे गाडी रूळावर येत असतानाच पुन्हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सलून व्यावसायिकांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो. अशा परिस्थितीत कुटुंब कसे चालवायचे.
- विजयकुमार ढगे,
सलून व्यावसायिक
गेल्या वर्षात कोरोनामुळे सात ते आठ महिने दुकाने बंद होती. दिवाळीपासून व्यवसाय कुठे तरी रुळावर येत असताना पुन्हा कोरोनामुळे दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही करायचे तरी काय ? किमान ठराविक वेळेत व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी.
- खुन्नमिर मोमीन,
कापड दुकानदार
कोरोनामुळे गेले वर्षभर व्यवसायावर परिणाम झाला. यामुळे दुकान भाडे, घरभाडे पदरमोड करून भरावे लागले. त्यात पुन्हा कोरोनाचा फटका बसत आहे. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे.
- परमेश्वर दुधभाते, इलेक्ट्रीक व्यावसायिक
वर्षभरात कोरोनामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले. आता कुठे व्यवसाय सुरळीत होत असतानाच पुन्हा कुलूप लागले.
- सिध्देश्वर वैरागकर, कलर व्यावसायिक
कोरोनामुळे लग्न सोहळ्यासह इतर कार्यक्रम बंद होते. त्यामुळे व्यवसायावर परिणाम तर झालाच. दिवाळीनंतर व्यवसायास परवानगी मिळाली. परंतु, कोरोनामुळे अपेक्षित व्यवसाय झाला नाही. त्यामुळे आम्हाला शासनाने मदत द्यावी.
- उमर शेख,
फोटोग्राफर
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर झाला. पुन्हा शाळा, महाविद्यालये सुरु झाल्याने व्यवसाय सुुरु झाला होता. परंतु, आता परत दुकानांना टाळे लावण्याची वेळ आली आहे.
- ओम कोरे, शालेय साहित्य विक्रेते