उस्मानाबाद : काेराेना महामारीमुळे शाळा बंद करण्याची नामुष्की शासनावर ओढावली हाेती. काेराेनाचा संसर्ग बऱ्यापैकी ओसरल्यानंतर शासनाने नववी ते बरावीचे वर्ग सुरू केले आहेत. सरलेल्या वर्षात या वर्गांची उपस्थिती ४८ टक्क्यांवर पाेहाेचली आहे. आता प्रतीक्षा आहे ती, पहिली ते आठवीचे वर्ग सुरू हाेण्याची. नव्या वर्षात लस येऊन साथ आटाेक्यात आल्यानंतर प्राथमिक शाळांचीही घंटा वाजेल, असा आशावाद पालक, शिक्षक अन् प्रशासकीय यंत्रणेकडूनही व्यक्त करण्यात आला.
काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर राज्यातील सर्वच शाळा बंद करण्यात आल्या. इतिहासात पहिल्यांदाच आठ ते नऊ महिने शाळा बंद आहेत. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. शासनाकडूनही त्यास प्राेत्साहन देण्यात आले. ॲपच्या माध्यमातून प्राथमिक तसेच माध्यमिक वर्गांचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला. काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास अनुमती दिली. त्यानुसार वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी फारशी उपस्थिती नव्हती; परंतु सध्या ८० हजार २९२ पैकी साधारपणे ४० हजार विद्यार्थी शाळेत येऊन ज्ञानर्जन करीत आहेत. ही संख्या वाढविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पालकांचे प्रबाेधन करण्यावर अधिक भर दिला जात आहे. नवीन वर्षात यावर आणखी भर दिला जाईल, असे माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मावळत्या वर्षात प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने काहीच निर्णय झालेला नाही; परंतु नवीन वर्षात लस येऊन साथ आटाेक्यात आल्यानंतर हेही वर्ग सुरू हाेतील, असा आशावाद पालक, शिक्षक तसेच अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.
चाैकट...
नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवसागणिक वाढत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग तसेच अन्या उपायाेजनांचे तंताेतंत पालन करून वर्ग भरविले जात ओहत. सध्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांच्या आसपास असली तरी नवीन वर्षात ती १०० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी आम्ही पावले उचलणार आहाेत. तसे नियाेजनही करण्यात आले आहे.
-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.
जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची गुरुवारी बैठक घेण्यात आली. यावेळी ऑनलाइन शिक्षणाचाही आढावा घेतला. नवीन वर्षात जर शासनाने चाैथी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले तर काय करावे? ज्ञानदान कुठल्या पद्धतीचे असावे? याबाबत सीईओ डाॅ. विजयकुमार फड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मार्गदर्शन केले.
-डाॅ. अरविंद माेहरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.
शाळा सुरू व्हाव्यात...
हाॅटेल्स, मंदिरे तसेच विवाह साेहळ्यांना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर मंजुरी देण्यात आली आहे. सध्या ९ वी १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे किमान नवीन वर्षात तरी सरकारने प्राथमिक शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष कल्याण बेताळे यांनी केली.
विद्यार्थ्यांचे नुकसान...
ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून फारसा फायदा हाेत नाही; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान थांबलेले नाही. मावळत्या वर्षात शासनाने नववी ते बरावीचे वर्ग सुरू केले आहेत. आता नवीन वर्षात किमान चाैथी ते आठवीपर्यंतचे तरी वर्ग सुरू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी केली.